म्हापसा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर

बैठकीत ठरावाच्या बाजूने ६, तर विरोधात ० मते


05th May, 11:56 pm
म्हापसा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : येथील म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी यांची संघटनेने अविश्वास ठरावाद्वारे उचलबांगडी केली आहे. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष अनिश जोशी यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार संघटनेने सोपविला आहे.
मंगळवारी सकाळी संघटनेची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष फळारी, सचिव सिद्धेश राऊत, उपाध्यक्ष अनिश जोशी, खजिनदार राजेश गावस, सहसचिव रूपेश शिंदे, सदस्य श्रीपाद सावंत, आशिष शिरोडकर, विशाल फळारी, वल्लभ मिशाळ व मुकूंद राऊळ हे दहाही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत अध्यक्ष फळारी यांना संघटनेने बजावलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिसीवर चर्चा करण्यात आली. व्यापारी संघटनेचे अध्यक्षपद किंवा टुगेदर फॉर म्हापसा या संघटनेचे उपाध्यक्ष यापैकी कोणतेही एक पद सांभाळावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. मात्र दोन्ही पदे सोडण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.
दरम्यान, संघटनेच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२७ पर्यंत असून नूतन अध्यक्षांची निवड होईपर्यंत प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष अनिश जोशी यांच्याकडे या बैठकीत पदभार देण्यात आला.
मतदानावेळी चौघांची तटस्थ भूमिका
बैठकीत फळारी यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. ठरावाच्या बाजूने सहा जणांनी मतदान केले, तर चौघांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे ठराव ६ विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला. अध्यक्ष संघटनेच्या कार्यकारिणीला सहकार्य करत नाहीत, संघटनेची प्रलंबित कामे पुढे नेण्यास ते असमर्थ ठरले आहेत, असे आरोप या अविश्वास ठरावाच्या नोटिसीमध्ये ठेवण्यात आले होते. 

हेही वाचा