सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांचा तपास सुरू

पणजी : उत्तर गोव्यातील (North Goa) थिवी (Thivim) परिसरात आज पहाटे घडलेल्या एका संशयास्पद घरफोडीच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबिय गोव्याबाहेर असल्याने अज्ञात चोरट्यांनी किती ऐवज लंपाक केला याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑच्छित वाडो येथील ‘आयडा व्हिला’ (घर क्रमांक १०८) मध्ये चार अज्ञात व्यक्ती घरात शिरल्याचे सीसीटीव्हीत (CCTV) दिसून आले आहे. त्या वेळी घरमालक पुणे येथे असल्याने घरात कुणी नव्हते. .
घरमालकाने शेजाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता मुख्य दरवाजा उघडा असलेला आढळला. तसेच घरातील कपाटे उघडी होती व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी (Goa Police) सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी व सुरक्षिततेचे उपाय कडक करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.