विकसित भारतासाठी डिजिटल मीडियाचे सहकार्य आवश्यक : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
28 mins ago
विकसित भारतासाठी डिजिटल मीडियाचे सहकार्य आवश्यक : मुख्यमंत्री

पणजी : विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणे केवळ पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री यांची जबाबदारी नसून; ती एक सामुहिक जबाबदारी आहे. यामध्ये डिजिटल मिडियाचे (Digital Media) योगदान आवश्यक आहे. डिजिटल मीडियाने योग्य खात्रीशीर आणि अभ्यासपूर्ण माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी केले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह राजा माने, अनिल पाटील, ओम प्रकाश शेट्ये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी देशात डिजिटल इंडिया (Digital India)  मोहिमेद्वारे डिजिटल युगाची सुरूवात केली. भारतात वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही मीडिया आणि आता डिजिटल मीडिया अशा स्वरूपात पत्रकारितेचा प्रवास आहे. कोविड नंतर डिजिटल मीडियाचा अधिक प्रसार झाला. सध्याची जनरेशन झी तसेच जनरेशन अल्फा केवळ मोबाईलवर कंटेंट पाहतात. या पिढीसाठी डिजिटल मीडियाने माहितीपूर्ण कंटेंट देणे आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो चांगल्या स्वरूपात योग्य ग्राफिक्सची मदत घेऊन मांडल्यास कन्टेन्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो

कोणत्याही क्षेत्रात अधिकारासोबत जबाबदाऱ्या देखील येतात. डिजिटल मीडियाची पोहोच जास्त असल्याने त्यांच्यावरील जबाबदारी देखील अधिक आहे. एखाद्या व्यक्तीला आपली प्रतिमा बनवण्यास अनेक वर्ष घालवावी लागतात. दहा वर्ष होऊन अधिक काम करत राहिले तर राजकारण्यांची प्रतिमा तयार होते. अशावेळी एका चुकीच्या बातमीमुळे त्या प्रतिमेला तडाही जाऊ शकतो. यामुळे डिजिटल मीडियाने कोणतीही बातमी देताना त्याबाबत आधी खात्री करणे आवश्यक आहे. अभ्यासपूर्ण आणि योग्य बातमी देणे हे डिजिटल मीडियाचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मागण्या केंद्राकडे पोहोचवणार

मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल पत्रकार संघटनेने काही मागण्या केल्या आहेत. आम्ही गोवा सरकार (Goa Government)  तर्फे या मागण्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पत्र लिहून पोहोचवणार आहोत.

हेही वाचा