तिघांना मिळाला डिस्चार्ज; एकाला गोमेकॉत केले दाखल

पणजी : मंगेशी येथे आदिनारायण हॉटेलजवळ एका टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा घडली. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले, त्यापैकी एका प्रवाशाला पुढील उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ येथे हलवण्यात आले. इतर तिघांना प्राथमिक उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर टेम्पो ट्रॅव्हलर म्हार्दोळ ते कुंडई या मार्गाने मार्गस्थ होत होता. मंगेशी परिसरातील आदिनारायण हॉटेलजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पोने समोरील ट्रकवर मागून धडक दिली.
जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, मडकई येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे नागराज हुंद्रे (वय २८, रा. फोंडा), नितीन गौडे (वय २८, रा. फोंडा) आणि शुभम कांबळे (वय २४, रा. फोंडा) अशी आहेत. या तिघांवर आवश्यक ते वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र, ४० वर्षीय सुधीर सुतार (रा. फोंडा) यांच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच म्हार्दोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलीस निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अपघाताच्या ठिकाणची सखोल पाहणी केली आणि पुरावे गोळा केले. पोलिसांनी या अपघाताची नोंद करून घेतली. पुढील तपास सुरू आहे.