कुडचडे-काकोडा नगरपालिकेतील इमारतीवर काढण्यात आलेल्या चित्राला आक्षेप

मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार; समीश्र प्रतिक्रिया

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
45 mins ago
कुडचडे-काकोडा नगरपालिकेतील इमारतीवर काढण्यात आलेल्या चित्राला आक्षेप

कुडचडे : येथील जुन्या नगरपालिका इमारतीच्या कोपऱ्यात काढण्यात आलेल्या चित्राला एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.  त्यानंतर यासंदर्भात सार्वजन‌िक पातळीवर चर्चा होऊ लागली आहे. आणि समीश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार कलाकार जोशेल डांटस यांनी जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून चित्र काढले आहे.  आज शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हे चित्र कुडचडे-काकोडा नगरपालिकेकडून योग्यपरवानगी घेऊन काढण्यात आले आहे.  तसेच या उपक्रमाला स्थानिक आमदार निलेश काब्राल यांचे समर्थन असून, हे काम त्यांनी स्वतःच्या खर्चाने पूर्ण केले आहे.

नगरपालिकेकडून देण्यात आलेल्या अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे की; “जोशेल डांटस यांचे जुन्या कुडचडे-काकोडा नगरपालिकेच्या (Curchorem-Cacora Muncipality) इमारतीच्या बाहेरील भिंतीवर जनजागृतीसाठी भिंतीवर चित्र काढण्यासाठी परवानगीसाठी पत्र प्राप्त झाले आहे.”

दरम्यान, कुडचडे मार्केटचे अध्यक्ष (Curchorem Market President)  रोश परेरा यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, परिसराच्या सुशोभीकरण आणि स्वच्छतेसाठी हा एक सकारात्मक प्रयत्न असल्याचे सांगितले. बाजार परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवणे ही प्राधान्याची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. आणि अशा उपक्रमांमुळे अधिक पर्यटक आकर्षित होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

रोश परेरा यांनी पुढे सांगितले की, स्वच्छता आणि सुशोभीकरणाबाबत यापूर्वीच्या बैठकीत चर्चा झाली होती. आणि कलाकाराला बाजार परिसरात चित्र काढण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शवित, बाजार स्वच्छ व हरित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या घडामोडीतून शहराच्या सुशोभीकरणात स्थानिक समुदायाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. सार्वजनिक कलाकृतींसाठी पारदर्शकता आणि योग्य संवादाची गरजही समोर येत आहे.

हेही वाचा