वाळपई पोलीस ठाण्यात एकाला मारहाण; पीएसआय प्रथमेश गावस यांची बदली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
वाळपई पोलीस ठाण्यात एकाला मारहाण; पीएसआय प्रथमेश गावस यांची बदली

वाळपई : मारहाणीची तक्रार देण्यास गेलेल्या एका तरुणाला वाळपई पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रथमेश गावस यांची राखीव लाईनमध्ये बदली करण्यात आली आहे.

मोहिन शेख या तरुणाला पोलीस कोठडीत असताना मारहाण करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या घटनेनंतर मोहिन शेख यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मोहिन शेख यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी व जवळच्यांनी काल वाळपई पोलीस स्थानकावर (Valpoi Police Station)  आंदोलन करून उपनिरीक्षक प्रथमेश गावस व पोलीस निरीक्षक यांची बदली करण्याची मागणी केली होती.

एका युवतीकडे असलेल्या प्रेमप्रकरणातून युवतीचे कुटुंबीय व तिच्या अन्य एका प्रियकराने मारहाण केल्याची तक्रार घेऊन मोहिन शेख पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार घेण्याऐवजी त्याला मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्यानेच मोहिनने आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी काल केला होता. याप्रकरणी सध्या पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांची बदली करण्यात आली आहे. 

पोलीस उपअधीक्षक चौकशी करणार 

दरम्यान, यासंदर्भात मोहिन शेख यांच्या कुटुंबियांनी पोलीस निरीक्षक (PI)  विदेश शिरोडकर यांना विचारले असता; त्यांनी सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दुपारी पोलीस उपअधीक्षक वाळपई पोलीस स्थानकात येऊन चौकशी करणार. उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांची बदली करण्यात आल्याचा व्हायरलेस संदेश आला असल्याचे कुटुंबियांना सांगितले.  घटनेची सखोल चौकशी सुरू असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा