पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना कायम करावे

आझाद मैदानात धरणे आंदोलन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 mins ago
पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना कायम करावे

पणजी : पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीचे कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी अथवा तात्पुरत्या स्वरूपावर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना कायम करावे, तसेच ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा, वेतन देणे आवश्यक आहे. आमची मागणी पूर्ण न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल; असा इशारा ॲड.अजय प्रभुगावकर यांनी दिला.

शुक्रवारी आझाद मैदानात (Azad Maidan, Panjim)  त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी येथे राज्यभरातील सोसायटी कर्मचाऱ्यांनी (Society staff)  धरणे आंदोलन केले. प्रभू गावकर यांनी सांगितले की, सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना २००३ पासून कायम करण्याचे खोटे आश्वासन देण्यात येत आहे.

मात्र आज २३ वर्षे झाली तरी ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. सध्या या कर्मचाऱ्यांना कायम न करण्याचे षडयंत्र सुरू आहे. या विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहोत. सोसायटीचे कर्मचारी नियमित असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच बिलिंग, डेटा एन्ट्री अथवा एमटीएसची कामे करत आहेत. मात्र त्यांना कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतन दिले जात आहे. 

याआधी कर्मचाऱ्यांना रोजंदारीनुसार वेतन दिले जात होते. पाच वर्षांपूर्वी आम्ही आंदोलन केल्यानंतर काही जणांना तात्पुरत्या स्वरूपाचा दर्जा देण्यात आला. २००३ नंतर पीडब्ल्यूडी (PWD) मंत्री असणाऱ्यांनी केवळ आपल्या मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना कायम केले आहे. मात्र अन्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयने दिलेल्या एका निर्णयाच्या आधारे गोव्यातील या कर्मचाऱ्यांना कायम करता येणे शक्य आहे. मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे प्रभुगावकर यांनी सांगितले. 

विनाकारण त्रास देऊ नये 

प्रभू गावकर यांनी सांगितले की, आम्ही आंदोलन सुरू केल्यापासून काही कर्मचाऱ्यांना खात्यातील अभियंत्यांकडून त्रास दिला जात आहे. कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणे हा आमचा हक्क असून; कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देणे थांबवले पाहिजे.



हेही वाचा