काकोडा सामुदायिक आरोग्य केंद्रात केले दाखल

काकोडा: सांगे-कुडचडे मार्गावर घडलेल्या एका अपघाताने पुन्हा एकदा वाहन चालवताना मोबाईलच्या वापराबाबतचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. काकोडा येथे दुचाकीचालकाने मोबाईलवर बोलत असताना आधी वाहनावरील नियंत्रण गमावले, नंतर दुसऱ्या लेनमध्ये जात समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला असून, त्याला तातडीने काकोडा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकीचालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. मोबाईलवरील संभाषणामुळे त्याचे लक्ष पूर्णपणे विचलित झाले आणि नकळत त्याने दुचाकी चुकीच्या बाजूला वळवली. यामुळे समोरील कारशी त्याची जोरदार टक्कर झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा पूर्ण केला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आधीच काही प्रमाणात अडचणी जाणवत आहे. अशा स्थितीत वाहन चालवताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असते. मात्र, वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे घडलेला हा अपघात वाहनचालकांच्या बेजबाबदार वृत्तीवर प्रकाश टाकतो. निष्काळजीपणामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहे.