अमेरिकेच्या नाकाबंदीचा इराणला ४.८ अब्ज डॉलरचा फटका; इराणमध्ये स्फोटात १४ आयआरजीसी जवान ठार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
अमेरिकेच्या नाकाबंदीचा इराणला ४.८ अब्ज डॉलरचा फटका; इराणमध्ये स्फोटात १४ आयआरजीसी जवान ठार

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेने (United States) आखाती समुद्रमार्गांवर वाढवलेल्या नाकाबंदीमुळे इराणच्या (Iran) तेल उत्पन्नाला अब्जावधींचा फटका बसल्याचे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे.  एक्सीओसच्या अहवालानुसार, या कारवाईमुळे इराणला सुमारे ४.८ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या नौदल कारवायांमुळे ओमानच्या आखातासह आसपासच्या महत्त्वाच्या मार्गांवर नियंत्रण ठेवले जात असून, इराणच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz)  हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग; हा या तणावाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अमेरिकेच्या मते, या मार्गावर नियंत्रण ठेवल्याने इराणच्या आर्थिक स्थैर्यावर थेट परिणाम करता येतो.

पेंटागॉनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी सांगितले की, ही कारवाई अपेक्षित परिणाम देत आहे. अमेरिकन प्रशासनाच्या मते, या उपाययोजनांचा उद्देश इराणची दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करण्याची क्षमता कमी करणे हा आहे.

इराणच्या झांजान प्रांतात स्फोटात १४ जवान ठार 

दरम्यान, या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये आणखी एक दुर्दैवी घटना घडली. झांजान प्रांतात शस्त्रास्त्र निकामी करण्याच्या मोहिमेदरम्यान झालेल्या स्फोटात इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) किमान १४ जवान ठार, तर २ जण जखमी झाले.

स्फोट न झालेला दारुगोळा निकामी करताना हा स्फोट झाला. या भागात अजूनही सुमारे १,२०० हेक्टर शेती क्षेत्र स्फोट न झालेल्या दारुगोळ्यामुळे धोक्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूणच, अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी आणि इराणमधील अंतर्गत दुर्घटना यामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या आखाती प्रदेशातील परिस्थिती अधिकच गंभीर बनत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा