नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई

मुंबई: देशातील अंमली पदार्थविरोधी लढ्यात मोठे यश मिळवत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau (NCB)) मुंबई परिसरात तब्बल ३४९ किलो उच्च प्रतीचे कोकेन (cocaine) जप्त केले आहे. या कोकेनची किंमत अंदाजे १,७४५ कोटी रुपये इतकी असून, क्रिकेटच्या पॅड्स आणि ग्लोव्ह्जमध्ये लपवून देशात आणले जात होते.
‘व्हाईट स्ट्राईक’ या कोडनेमने राबवलेल्या या कारवाईसाठी सहा महिन्यांहून अधिक काळ गुप्त माहिती संकलन आणि पाळत ठेवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नवी मुंबई–ठाणे (Navi Mumbai–Thane) परिसरातील कळंबोली–भिवंडी (Kalamboli–Bhiwandi) लॉजिस्टिक कॉरिडॉरमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले.
कारवाईदरम्यान कळंबोलीतील केडब्ल्यूसी (KWC) वेअरहाऊसिंग कॉम्प्लेक्सजवळ एक मारुती सुझुकी सुपर कॅरी वाहन ( Maruti Suzuki Super Carry) अडवण्यात आले. तपासणीदरम्यान क्रिकेट साहित्याच्या बॉक्समध्ये लपवलेले १३६ एक किलो वजनाचे कोकेनचे पॅकेट्स जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका आरोपीला घटनास्थळी अटक करण्यात आली.
भिवंडीतील गोदामावर छापा टाकून २१३ किलो कोकेन जप्त
चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील रेहणाल गावातील गोदामावर छापा टाकून आणखी २१३ किलो कोकेन हस्तगत करण्यात आले. या कारवाईत एकूण ३४९ किलो कोकेन जप्त करण्यात आले असून, आधुनिक तस्करी पद्धतीचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
मुख्य सूत्रधार, वित्तपुरवठादाराचा शोध सुरू
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोकेन आयात केलेल्या यंत्रांच्या पोकळ भागांमध्ये लपवून आणले जात होते. प्रत्येक पॅकेट नऊ थरांच्या पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले होते. ज्यावर काळ्या ग्रीसी पदार्थाचा थर देऊन तपास चुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भिवंडीतील वेअरहाऊस साखळीचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी जाळे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, वित्तपुरवठादार आणि ग्राहक यांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah ) यांनी या कारवाईचे कौतुक करत, “अंमली पदार्थांचे जाळे उद्वस्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे,” असे स्पष्ट केले. त्यांनी एनसीबीच्या या कारवाईला “लहान धाग्यापासून मोठे जाळे उलगडण्याचे उत्कृष्ट उदाहरण” असेही म्हटले.
अलीकडील काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक
दरवर्षी भारतात साधारण २०० ते ३०० किलो कोकेन जप्त होते. त्यामानाने ही ३४९ किलोची कारवाई अलीकडील काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.