डिचोलीत कामगार दिनानिमित्त सफाई कामगारांचा गौरव

स्नेहभोजन, क्रीडा स्पर्धा : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा अभिनव उपक्रम


9 mins ago
डिचोलीत कामगार दिनानिमित्त सफाई कामगारांचा गौरव

गौरवण्यात आलेल्या डिचोली पालिका सफाई कामगारांसोबत विजयकुमार नाटेकर, विजय तेलंग, नारायण बेतकीकर, विश्वास गावस, अरुण मांद्रेकर, समरेश काणेकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : शहराची स्वच्छता राखणारे सफाई कामगार हे खरे सेवक स्वच्छता दूत असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले. कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला. यावेळी स्नेहभोजन व विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.
कामगार दिनानिमित्त छ. शिवाजी महाराज मैदानावर कामगारांच्या वतीने विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाभावी डॉ. दिनेश आमोणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कामगारांच्या योगदानाचे कौतुक करताना त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.
सायंकाळी स्नेहभोजन कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, ज्येष्ठ नागरिक विजय तेलंग, नारायण बेतकीकर, विश्वास गावस, अरुण मांजरेकर, समरेश काणेकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या कामगारांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या पुढाकाराने करण्यात आल्याची माहिती नारायण बेतकीकर यांनी दिली.
सफाई कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक
कामगार दिन हा कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून देणारा दिवस आहे. समाजाच्या विकासात कामगारांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या कष्टामुळेच शहरांची स्वच्छता व सुव्यवस्था टिकून राहते. कचरा वेळेवर उचलला गेला नाही तर मोठी आपत्ती उद्भवू शकते. त्यामुळे सफाई कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे, असेही आमदार डॉ. शेट्ये यांनी स्पस्ट केले  

हेही वाचा