संशयितांना नोटीस जारी : पुढील सुनावणी १ जुलै रोजी

पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी पर्वरी येथील प्रिन्सिपल अकाउंटंट जनरल कार्यालयातील साहाय्यक लेखा ऑडिट अधिकारी जाॅर्ज वर्गीस याच्यासह चार जणांविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेऊन संशयितांना नोटीस जारी करून पुढील सुनावणी १ जुलै रोजी ठेवली आहे.
सीबीआयच्या गोवा विभागाचे अतिरिक्त अधीक्षक अलोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अपर्णा चोपडेकर यांनी जाॅर्ज वर्गीस याच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत २०२३ मध्ये गुन्हा दाखल केला. सीबीआयने साहाय्यक लेखा ऑडिट अधिकारी जाॅर्ज वर्गीस याच्या १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२३ या सेवा कालावधीच्या आणि कुटुंबीयांच्या मालमत्तेचे लेखा अहवाल तपासले होते. या प्रकरणी ३१ मार्च २०२३ पर्यंत त्याचे वेतन १ कोटी २१ लाख ८४ हजार ०७५ रुपये झाले आहे. सेवा कालावधीपूर्वी त्याच्याकडे ५ लाख रुपये किमतीचे १९९९ मध्ये केरळ येथे दुकान खरेदी केल्याचे समोर आले आहे. वरील कालावधीत वर्गीस आणि त्याच्या पत्नीने २०१८ मध्ये पर्वरी येथे ५० लाख रुपये किमतीचा बंगला खरेदी केला. २०२२ मध्ये वर्गीस दाम्पत्याने केरळमध्ये २५ लाख रुपये किमतीची शेत जमीन खरेदी केली. त्यामुळे त्याच्याकडे ८० लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आहे. मार्च २०१७ मध्ये वर्गीस यांनी १.३० लाख रुपये किमतीची टीव्हीएस आपाचे मोटारसायकल खरेदी केली. जुलै २०१९ मध्ये त्याच्या पत्नीने ९० हजारांची टीव्हीएस स्कूटर खरेदी केली. २०२१ मध्ये वर्गीस यांनी १३ लाखांची ऑडी क्यू-३, कार खरेदी केली. याशिवाय २०२१ मध्ये वर्गीस यांनी ५ लाखांची आय १० कार खरेदी केली. त्यामुळे त्याच्याकडे २० लाख २० हजार रुपये जंगम मालमत्ता मिळून त्याची एकूण मालमत्ता १ कोटी २० हजार रुपये असल्याचे चौकशी दरम्यान माहिती समोर आले होती.
वर्गीस यांनी २०२२ मध्ये ६.०२ लाख रुपये किमतीची जमीन विक्री केली. वरील कालावधीत त्याने स्टेट बँकेकडून २३.५५ लाखांचे गृह कर्ज घेतले. याशिवाय स्टेट बँकेकडून १८ लाखांचे अतिरिक्त कर्ज घेतले. २०२२ मध्ये ६ लाख रुपये बँक खात्यात जमा केले. तर, ३ लाख रुपये भविष्य निधीतून रक्कम काढली. ६५ लाख २७ हजार ०७५ रुपये त्याला वेतन मिळाले. वरील सर्व मिळून त्याचे एकूण उत्पन्न १ कोटी २१ लाख ८४ हजार ०७५ रुपये ग्राह्य धरण्यात आले.
सीबीआयने जाॅर्ज वर्गीस याच्यासह पत्नी आणि मिळून चार जणांविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेऊन संशयितांना नोटीस जारी करून पुढील सुनावणी १ जुलै रोजी ठेवली आहे.
४८ लाखांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा
वरील कालावधीत त्याने ७४ लाख ७६ हजार ७३२ रुपये खर्च केल्याची माहिती उपलब्ध झाली होती. तर ४७ लाख ०७ हजार ३४३ रुपये सीबीआयने संभाव्य बचत म्हणून ग्राह्य धरली. त्यामुळे जाॅर्ज वर्गीस याच्याकडे उत्पन्नातील ३९.४९ टक्के म्हणजे ४८ लाख १२ हजार ६५७ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा सीबीआयने केला.