खर्रे सुकूर येथे स्वयंअपघात

म्हापसा : खर्रे सुकूर येथे मोटारसायकलची झाडाला धडक बसल्याने झालेल्या स्वयंअपघातात जॉन पॉल फर्नांडिस (३४, गावरावाडो, कळंगुट) या दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. अपघात बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास खर्रे सुकूर येथील वालांकिनी चॅपेलजवळ घडला होता. तर सायंकाळी उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. जॉन हा जीए ०३ एम ०८३२ क्रमांकाच्या यामाहा मोटरसायकलने जात होता. घटनास्थळी दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकीची रस्त्याच्या कडेच्या झाडाला धडक बसली. अपघातात युवक गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून उपचारार्थ गोमेकॉत दाखल करण्यात आले. उपचारावेळी सायंकाळी त्याचे निधन झाले. तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश चोडणकर हे करीत आहेत.