खट्टरची कोलवाळ कारागृहातून सुटका

म्हापसा : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात जामीन मंजूर झालेला संशयित आरोपी माधव खट्टर याला सोपस्कारानंतर कोलवाळ कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. वास्को न्यायालयाने बुधवारी खट्टर याचा सशर्त जामीन अर्ज मंजूर केला होता. गुन्हा शाखेने माधव खट्टर याची केलेली अटक ही बेकायदा असल्याचा दावा त्याचे वकील अॅड. नागेश जोशी यांनी केला आहे.
कोलवाळ कारागृहातून माधव खट्टर हा गुरुवारी दुपारी बाहेर पडला. त्यावेळी त्याचे वकील अॅड. जोशी यांनी पोलिसांनी आपल्या अशिलाची केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगितले. मुख्य संशयित आरोपी गौतम खट्टर हा सापडत नसल्यानेच गुन्हा शाखेने माधव याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले आणि अटक केली. माधव खट्टरचा त्या वादग्रस्त भाषणाशी किंवा त्याच्या लेखनाशी दूरवरचाही संबंध नाही. पोलिसांनी माधवला अटक करताना कोणत्याही प्रकारचे वॉरंट दाखवले नाही. तसेच अटकेसाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे सर्रासरित्या उल्लंघन केले. माधव केवळ पर्यटनासाठी गोव्यात आला होता, त्याचा त्या कार्यक्रमाशी किंवा आयोजकांशी कोणताही संबंध नव्हता, असे अॅड. जोशी म्हणाले.
अॅड. जोशी म्हणाले की, मुख्य संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हता, म्हणून दबावापोटी एका निष्पाप व्यक्तीला या प्रकरणात गोवण्यात आले. या बेकायदेशीर अटकेमुळे माधव खट्टरला सात दिवस विनाकारण पोलीस कोठडीत रहावे लागले. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या या मनमानी कारभाराविरोधात आम्ही लवकरच आवश्यक कायदेशीर पावले उचलणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.