पारधी टोळीतील चौघा आरोपींना साधी कारावासाची शिक्षा

मालपे येथे टॅक्सी चालक खुनी हल्ला प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 11:28 pm
पारधी टोळीतील चौघा आरोपींना साधी कारावासाची शिक्षा

म्हापसा : कळंगुट येथील टॅक्सी चालक संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर यांच्यावर मालपे पेडणे येथे झालेल्या खुनी हल्ल्यातील पारधी टोळीतील आरोपींपैकी तिघांना ९ महिने तर एकाला तीन महिने साधी कैदेची शिक्षा म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी ठोठावली आहे.

आरोपी शंकर मधुकर पवार उर्फ हड्या (रा. सरोळे सोलापूर महाराष्ट्र), राजू मधुकर पवार उर्फ गुड्या (रा. सरोळे सोलापूर), अजय सुनिल भोसले (रा. तुळजापूर महाराष्ट्र) या तिघांना भारतीय न्याय संहितेच्या १०९, ३१० (२), ३११, ३१२ व ३ (५) कलमाखाली दोषी घोषित करून त्यांना या प्रत्येक गुन्ह्यासाठी प्रत्येकी ९ महिने साधा कारावास तर, आरोपी देवगण बापू पवार उर्फ विजय (रा. सांगली महाराष्ट्र) याला वरील कलमान्वये प्रत्येक गुन्ह्यासाठी ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा दिली. शिवाय आरोपींनी कारागृहात काढलेला अवधी हा या शिक्षेतून वगळण्यात आला आहे.

दरम्यान, हा हल्ल्याचा प्रकार ९ जुलै २०२५ रोजी रात्री ८.४५ ते ९ दरम्यान मालपे न्हयबाग रस्त्यावर घडला होता. एका अल्पवयीनासह पाच जणांच्या गटाने फिर्यादी संजीवन वेगुर्लेकर यांची अर्टीगा गाडी भाड्याने कळंगुटहून पत्रादेवीपर्यंत जाण्यासाठी घेतली होती. आरोपींचा फिर्यादी चालकाला मारून कार पळवण्याचा कट होता.

वाटेत घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी फिर्यादींना बळजबरीने रोखून धरले आणि एका धारदार श्स्त्राने त्यांच्यावर निर्घृण हल्ला केला होता. यात त्यांचा चेहरा, डोके, खांदा आणि हाताला जबर जखम झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत फिर्यादीला तिथेच रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार झाले होते.

याप्रकरणी पेडणे पोलिसांनी वरील कलमान्वये खूनी हल्ल्याचा गुन्हा नोंद करत चौकशीअंती ११ जुलै रोजी एका अल्पवयीन आरोपीला पकडून ताब्यात घेतले होते. त्यानंतर २२ जुलै रोजी शंकर पवार, राजू पवार व अजय पवार या तिघांना महाष्ट्रातून अटक केली. तर, पाच महिने फरार असलेला आरोपी देवगण पवार याला ८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातून अटक केली होती. त्यापासून आरोपी हे पोलीस तसेच न्यायालयीन कोठडीत होते.

दरम्यान, याप्रकरणी चौकशी करून पेडणेचे पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

पेडणे पोलिसांना न्यायालयाचे निर्देश

आरोपी शंकर, राजू आणि अजय यांचा सावंतवाडी पोलिसांच्या गुन्ह्यात समावेश असल्यामुळे त्यांची रवानगी स्थानिक पोलिसांमार्फत ओरोस जिल्हा कारागृहात करावी. देवगण पवार याला सांगली जिल्हा कारागृह अधीक्षकांकडे सुपूर्द करावा, असे निर्देश पेडणे पोलिसांना न्यायालयाने या निवाड्यात दिले आहेत. 

हेही वाचा