पोरस्कडे येथे कार अपघातात पुणे येथील दाम्पत्य जखमी

कारवरील नियंत्रण गेल्याने अपघात

Story: विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 11:53 pm
पोरस्कडे येथे कार अपघातात पुणे येथील दाम्पत्य जखमी

पेडणे : पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर शुक्रवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास कारवरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात पुणे येथील शैलेश सातो (वय २८) व श्रावणी सातो (वय २२) हे दांपत्य गंभीर जखमी झाले. अपघातात विजेचा एक खांब मोडून पडला. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. एच, १२ - आर वाय ७६७५ या क्रमांकाच्या कारने शैलेश सातो व श्रावणी सातो हे दांपत्य पुण्याहून गोव्यात येत होते.

उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या बांधकामापासून काही अंतरावर त्यांची कार पोहचताच चालकाचे कारवरील नियंत्रण गेल्याने प्रथम या कारने महामार्गापासून बाहेर असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली.या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की खांब अक्षरशः तुटून खाली कोसळला.

धडक दिल्यानंतरही कारचा वेग कमी न झाल्याने ती रस्त्याच्या बाहेर जाऊन सखल भागातील झाडीत घुसली. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना मदत केली व आपत्कालीन सेवांना माहिती दिली.

अपघातात शैलेश सातो व श्रावणी सातो हे दाम्पत्य जखमी झाले.

१०८ रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले. या खासगी इस्पितळात या दांपत्यावर उपचार सुरू आहेत.

पेडणे पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक अभय पालयेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास तालयेकर करीत आहेत.

हा रस्ता धोकादायक बनला असून याठिकाणी वारंवार अपघात होऊनही संबंधित खात्याला अद्याप जाग आली नाही.

मागील आठवड्यातही याच ठिकाणी अपघात

गेल्या आठवड्यातही एका ट्रक चालकाचा ताबा जाऊन याच जागेवरील विजेचा खांब मोडला होता. यानंतर याठिकाणी नवा वीज खांब घालण्यात आला होता. शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे या ठिकाणी घालण्यात आलेल्या नवा खांब कारने जोरदार धडक दिल्यामुळे मोडला. 

हेही वाचा