हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणी शिवशंकर मयेकर याला अटक

एसआयटीकडून कारवाई : पाच दिवसांची पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th April, 11:38 pm
हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणी शिवशंकर मयेकर याला अटक

पणजी : गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात संशयित शिवशंकर मयेकर याला अटक केली. त्याला बार्देश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

हणजूण कोमुनिदादच्या अ‍ॅटर्नी सॅबेस्तीयन डिसोझा यांनी हणजूण कोमुनिदादची जमीन बनावट दस्तावेजाद्वारे हडप केल्याची तक्रार प्रथम हणजूण पोलीस स्थानकात दिली होती. ही तक्रार म्हापसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार, सर्वे क्रमांक ४९६/१ व ४९६/१-ए मधील २ लाख चौ.मी. जमिनीच्या १९५२ मधील हंगामी ताबा प्रमाणपत्र, सीमांकन कार्यवाही पत्र, आदेश पत्र आणि १९५८ च्या अंतिम ताबा प्रमाणपत्र बनावट करून त्यावर कोमुनिदादच्या अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी आणि हस्तलिखिताची नक्कल केली. ही जमीन संशयितांनी आपल्या मालकीची असल्याची भासवून सरकारी कार्यालयात नोंदवून हडप केल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन तत्कालीन पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी यशवंत सावंत व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, अ‍ॅटर्नी सॅबेस्तीयन डिसोझा यांनी सर्व्हे क्र. ४३६/१ मधील जमीन हडप केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार, म्हापसा पोलिसांनी सुदेश पार्शेकर, शिवशंकर मयेकर, राजेश पार्शेकर व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग केले.

याच दरम्यान मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करून ईडीने वरील दोन्ही गुन्ह्यांची प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानंतर ईडीने ९ सप्टेंबर २०२५ रोजी हणजूण, आसगाव, हैदराबाद येथे मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. ईडीने यशवंत सावंत यांच्यासह स्थानिक पंच आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर कारवाई केली. यात हणजूण कोमुनिदादची १२०० कोटी रुपये किमतीची ३.५ लाख चौ.मी. जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला.

ईडीने गोव्यासह, नवी दिल्ली, चंडीगढ मिळून सहा ठिकाणी छापे टाकले. या संदर्भात ईडीने ‘थिंकींग आॅफ यू’ चे भागीदार उमर जाहूर शाह आणि नीरज शर्मा यांच्यासह पर्पल मार्टिन एंटरटेनमेंट प्रा. लि. चे राजेश कुमार यांच्यावर कारवाई केली. यात दीड लाख अमेरिकन डाॅलर्सची (१.२५ कोटी रुपये) क्रिप्टो करन्सी गोठवली.

एसआयटीने हणजूण येथील सर्व्हे क्र. ४३६/१ मधील जमीन हडप प्रकरणात न्यायालयीन कोठडी असलेल्या मुख्य सूत्रधार शिवशंकर मयेकर याला गुरुवार २३ रोजी अटक केली. त्याला शुक्रवार, २४ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली. एसआयटीचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनीत कवळेकर पुढील तपास करीत आहेत.

७२ लाखांची रक्कम, आलिशान गाड्या जप्त

ईडीने यशवंत सावंत व इतरांकडून ७२ लाखांची रोख रक्कम, सात आलिशान गाड्या आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. त्यानंतर ईडीने १ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवशंकर मयेकर याला अटक केली. 

हेही वाचा