सदोष मनुष्यवधप्रकरणी ६ वर्षांचा सश्रम कारावास, ३ हजारांचा दंड

मृत युवकाला ठार मारण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खुनाचा गुन्हा रद्द

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
सदोष मनुष्यवधप्रकरणी ६ वर्षांचा सश्रम कारावास, ३ हजारांचा दंड

पणजी : संशयित आणि मंगल यांच्यात झटापट झाली होती आणि रागाच्या भरात, संशयिताने मंगलवर चाकूने हल्ला केला. तसेच संशयिताचा त्याला ठार मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असे न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून समोर आले आहे, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील सत्र न्यायालयाने खुनाचा गुन्हा रद्द करून सदोष मनुष्यवध प्रकरणी संशयित रशबिहारी महातो (पश्चिम बंगाल) याला सहा वर्षे २१ दिवसांचा सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याबाबतचा आदेश सत्र न्या. विजया आंब्रे यांनी दिला.

या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी २ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, अमर धारगळकर यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी संशयित रशबिहारी महातो याने पूर्ववैमनस्यातून त्याच्या खोलीत राहणाऱ्या मंगल हेंबराम या युवकाच्या पोटावर चाकूने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर गोमेकॉत उपचार सुरू असताना मंगल हेंबराम याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलीस स्थानकाच्या तत्कालीन उपनिरीक्षक वॅरोनिका कुतिन्हो यांनी प्रथम प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित रशबिहारी माहातो याला अटक केली होती. त्यानंतर ४ एप्रिल २०२० रोजी मंगल याचे निधन झाले. त्यानंतर महातो याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित रशबिहारी माहातो याच्यातर्फे अॅड. वहिदा यलगर यांनी युक्तिवाद मांडला. तर अॅड. एस. परमर यांनी त्यांना साथ दिली. त्यात त्यांनी संशयित आणि मंगल यांच्यात झटापट झाली होती आणि रागाच्या भरात, संशयिताने मंगलवर चाकूने हल्ला केला. तसेच संशयिताचा मंगलला ठार मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा दावा केला. तसेच हे प्रकरण सदोष मनुष्यवध असल्याचा युक्तिवाद मांडला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर रशबिहारी महातो याला सदोष मनुष्यवध प्रकरणी दोषी ठरविले. तसेच संशयिताला सहा वर्षे २१ दिवसांचा सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

हेही वाचा