अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातून संशयिताची निर्दोष सुटका

पीडितेला न्यायालयात हजर करण्यात अपयश आल्याचे नि​रीक्षण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st April, 11:45 pm
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातून संशयिताची निर्दोष सुटका

पणजी : शॉपिंगच्या निमित्ताने २०२२ मध्ये पणजी शहरातील एका माॅलजवळ असलेल्या लाॅजमध्ये नेऊन १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील पीडित मुलीचा थांगपत्ता नसल्यामुळे तिला न्यायालयात हजर करण्यात अपयश आले, असे निरीक्षण नोंदवून संशयित सुजन सुनिल तालुकदार (३८, मूळ पश्चिम बंगाल) याची पाॅक्सो न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.

या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी २७ जून २०२२ रोजी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार, मुलगी १० दिवसांपूर्वी गोव्यात आली होती. या दरम्यान संशयिताने तिच्याशी मैत्री केली. दि. २६ जून २०२२ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ दरम्यान शॉपिंग करण्याच्या बहाण्याने तिला शहरातील एका माॅलच्याजवळ असलेल्या लाॅजमध्ये घेऊन गेला होता. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच संशयिताने तिला मारहाण करून वरील घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तक्रारीची दखल घेऊन पणजी पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक सपना गावस यांनी संशयित सुजन याच्याविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर १९ आॅगस्ट २०२२ रोजी संशयिताविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणातील प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन संशयिताविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, अनेकदा संधी देऊन पीडित मुलीला उलटतपासणीसाठी हजर करण्यात आले नाही. त्यामुळे पीडित मुलीची न्यायालयात उलटतपासणी करण्यात अपयश आले, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित सुजन सुनिल तालुकदार याची निर्दोष सुटका केली.

लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

शॉपिंग करण्याच्या बहाण्याने मुलीला तो पणजी शहरातील एका माॅलच्याजवळ असलेल्या लाॅजमध्ये घेऊन गेला होता. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच संशयिताने तिला मारहाण करून वरील घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

हेही वाचा