‘डिजिटल अरेस्ट’द्वारे महिलेला ३३.५० लाखांचा गंडा

‘ट्राय’चा अधिकारी असल्याचे भासवून बार्देशातील वृद्धेला फसवले


2 hours ago
‘डिजिटल अरेस्ट’द्वारे महिलेला ३३.५० लाखांचा गंडा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बार्देश तालुक्यातील एका ज्येष्ठ महिलेला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे भासवून बंगळुरू पोलीस स्थानकात मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा नोंद झाल्याचा दावा करून ‘डिजिटल अरेस्ट’ द्वारे ३३.५० लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बार्देश तालुक्यातील एका ६५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे भासवून ७९९३०६४३०९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कॉल करण्यात आला. संशयिताने ज्येष्ठ महिलेला त्यांचा मोबाईल क्रमांक एका मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचे खोटेच सांगितले. तिच्या विरोधात बंगळुरू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असल्याचेही त्या ज्येष्ठ महिलेला सांगितले. तक्रारदार महिलेला ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत बनावट वाॅरन्ट पाठवून ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकण्यात आला. हे प्रकरण मिटविण्यासाठी त्या ज्येष्ठ महिलेला विविध बँक खात्यांत ३३ लाख ५० हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. ज्येष्ठ महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी भारतीय न्याय संहितेच्या आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली वरील व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
सायबर गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ऑफरवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक व बँकिंग माहिती कुणालाही देऊ नका. ओटीपी, पासवर्ड, कार्ड तपशील शेअर करू नका. फक्त अधिकृत वेबसाईट/अॅपचाच वापर करा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० हेल्पलाईनवर किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा.