हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी म्हापसा पोलिसांकडून गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 11:52 pm
हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी म्हापसा पोलिसांकडून गुन्हा नोंद

म्हापसा : फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदू देवतांबद्दल अश्लील आणि अवमानकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी बाबिट फर्नांडिस या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी गोयंची नारी शक्ती संस्थेच्या निशा वेर्णेकर यांनी २२ एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

बाबिट फर्नांडिस याने जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर हिंदू देवतांना लक्ष्य करणारा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला. या कृत्यामुळे तक्रारदाराच्या आणि समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून दोन समुदायांमध्ये शत्रुत्व आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा ठपका त्यांनी तक्रारीत ठेवला आहे.

म्हापसा पोलिसांनी भा. न्या. सं.च्या कलम १९६ आणि २९९ अन्वये हा गुन्हा दाखल केला.

म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदू धर्मातील आराध्य दैवतांवर आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल दोघांविरुद्ध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली. म्हापसा पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांची जयेश थळी, ओंकार नाईक, सुजन नाईक आणि इतरांनी भेट घेतली व लेखी तक्रार दाखल केली. बाबिट फर्नांडिस आणि एल्सबन मार्क मास्कारेन्हस यांनी प्रभू रामचंद्र, सीता माता आणि भगवान परशुराम यांमयाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली होती.

फोंडा पोलीस स्थानकात तक्रार

गौतम खट्टर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर समाज माध्यमातून हिंदू देवतांबाबत अपशब्द वापरले जात असल्याने हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत. यासंबंधी फोंडा पोलीस स्थानकात ३ जणांची नावे देण्यात आली असून येत्या दोन दिवसांत त्यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेचे सत्यविजय नाईक यांनी दिला आहे. 

हेही वाचा