आंबं...!

आजोबांनी लावलेलं हे झाड म्हणजे परंपरा सांगणारं एक वैभव होतं. आजपर्यंत कित्येक गोष्टी त्या झाडाखाली घडल्या होत्या. शेतात काम सुरू असले की याच्या सावलीतच विसावा मिळायचा, मुले लहान असताना बिनघोर याच्या सावलीत झोपायची, कितीतरी जत्रा झाल्या तिथे.

Story: कथा |
25th April, 11:31 pm
आंबं...!

उन्हाची रखरख वाढली होती. नुकतंच औत सोडलेलं. झाडाखाली सावलीत बैल चरत होते. मारुतीने पाटातल्या पाण्यात चूळ भरून तोंडावर पाणी मारलं, पाटातल्या पाण्याने तहान भागवली आणि मळलेल्या टॉवेलने तोंड पुसलं. वरच्या बाजूच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली मारुतीने थोडा विसावा घेतला. जेवायला घराकडे जायचं होतं. पाटाच्या कडेला आलेलं हिरवंगार गवत खाण्यात बैल गुंग झालेले. गवत ओरबाडताना गवताचा आवाज कानावर पडत होता. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची सुरावट कानाला गोड वाटत होती. उन्हं तर डोक्यावर आलेली, त्यामुळे झाडाची सावली बुंध्यापाशी रेंगाळताना दिसली. हाताची घडी डोक्याखाली घालून मारुतीने त्या सावलीत अंग पसरलं. गवताची वाळलेली काडी दातात चावत, वर झाडाकडे बघत तो पडला होता. झाडाचा अवाढव्य आवाका त्याच्या डोळ्यात मावणारा नव्हता. पानांच्या आडून एखादा कावडसा खाली डोकावत होता.

​झाडावर यंदा बराच बहर आला होता, याचा अंदाज मारुतीला आला. लटकणाऱ्या कैऱ्या बघून मारुती मनोमन हसला. मनातल्या मनात त्याला कडगावचा शुक्रवारचा बाजार दिसला. कडगावचा बाजार म्हणजे या पंचक्रोशीतला मोठा बाजार. आजूबाजूच्या वीस-पंचवीस गावांचे मुख्य ठिकाण. सगळ्या वाड्यावस्त्या डोंगरात विखुरलेल्या. पक्के रस्ते क्वचित कुठेतरी; नाहीतर सगळ्या वाड्यांवर पायवाट, नाहीतर बैलगाडीचा रस्ता. दरवर्षी आंबे लागले की मारुती झाडांची राखण करी. आंबे पाडाला आले की ते सगळे झाडावरून उतरायचे, गवतात आडीला घालायचे आणि पिकले की बुट्टी भरून डोक्यावरून न्यायचे. कडगावात विकून चार पैसे हातात पडले की मारुती समाधानाने भरून जायचा.

​वाडीवरून, घरातून आईची हाक आली तशी मारुतीची तंद्री भंगली आणि तो भानावर आला. आईलाही 'जेवायला येतो' अशी परत हाक देऊन तो लगबगीने उठला. अंथरलेला टॉवेल त्याने डोक्याला गुंडाळला आणि बैलांकडे गेला. बैलांना पाटातले पाणी पाजलं आणि त्यांचे दोन्ही कासरे हातात पकडून, एक बैल मागे आणि दुसरा पुढे असं करत वाडीची वाट धरली.

​गोठ्यात आला तसा बाकीची जनावरे रवंथ करत बसलेली होती. थोरल्या गाईच्या तोंडातून तर चांगला पांढरा फेस बाहेर पडत होता. याच गाईची ही सारी पिलावळ, याच गाईचा हा गोठा! तिथेच एका बाजूला शेरडं खाऊन-पिऊन डोळे मिटून झिंगत होती. बैलांना दावणीला बांधलं आणि तो घराकडे परतला.

​पायावर पाणी घेऊन, चूळ भरून, तोंडावर पाण्याचे चार हाबके मारले आणि खांद्यावरच्या टॉवेलने तोंड पुसत तो ताटावर येऊन बसला. आईला पोर राबताना बघून समाधान वाटायचं. आपण राखलेली शेती हे पोरगं पण राखील, म्हणून बरं वाटायचं.

​भाकरीचा तुकडा मोडत मारुती म्हणाला,

“आई, बाबा कुठं हाय गं..?”

“ढोरं चारून आणली आणि आत्ताच जेवले... फणसाखाली फटकुरं घेऊन झोपले असतील...!” आईने उत्तर दिले.

​“आई.... झाडाला यंदा लई आंबं लागल्यात बघ! राखण करायला पायजे, नाहीतर कुणाचं कोण पार सगळं झाडून नेतील. जेवढं हाताला मिळतील तेवढं आडी घालूया, म्हणजे थोडं पैसं मिळतील बघ!”

“व्हय रं... झाड पार वाकलंय आंब्यांनी..! करू की राखण!” आईने आपली संमती दर्शवली.

​झाडावरून आंबे उतरायचे म्हणजे बरंच कष्ट पडायचं. आंबे लागले की झाडाची राखण करायला लागायची. नाहीतर रात्री-अपरात्री कुणीही अंधाराचा फायदा घेऊन झाड पार झोडून घेऊन जाई. दुसऱ्या दिवशी सकाळी झाडाखाली पडलेले तुटके-फुटके आंबे असायचे. काठीने झोडून आंबे चोरल्याच्या खुणा झाडावर दिसायच्या. आंब्यांसोबत झाडाची पाने पण खाली पडायची. तुटकं-फुटकं आंबं बघून तोंडात आपोआप शिव्या यायच्या. फार वाईट वाटायचं. आंबे पाडाला आले की ते काठीला जाळी बांधून काढायचे. मग घरात नेऊन गवतात पिकत घालायचे.

​मारुतीच्या आजोबांनी लावलेलं झाड ते. मोठ्या आंब्याचं झाड. हे झाडाचं बी आजोबांनी खाली तळकोकणातून आणलं होतं म्हणे! तिकडेही काही पाहुणे आहेत, पण आता तिकडे फारसा कुणाचा संपर्क नाही. त्या वेळी... तरुणपणी आजोबा पायी जायचा. येताना तिथले आंबे घेऊन आला. त्यातल्या एका आंब्याचं हे झाड तयार झालं. साठ-सत्तर वर्षांपेक्षा मोठं झाड असावं. आता आजोबा नाहीत, मारुतीचे बाबा आता साठ एक वर्षांचे झालेत; म्हणजे झाड बरंच जुनं होतं. झाडाचा घेर दोघांच्या हातात येण्यासारखा नव्हता. अवाढव्य वाढलेलं, लांबून पाहिलं तरी एखादा मोठा माठ पालथा घातला असावा असं दिसायचं. डेरेदार वृक्षच जणू. शेती बरीच होती. त्यातली थोडी माळरान, तर थोडी विहिरीच्या पाण्यावरची. मारुती मात्र बापाच्या मागे हे राखणार याची खात्री पक्की होती; कारण मारुती गुराढोरांची, शेताची काळजी घ्यायचा. सगळं जबाबदारीने बघायचा.

​आजोबांनी लावलेलं हे झाड म्हणजे परंपरा सांगणारं एक वैभव होतं. आजपर्यंत कित्येक गोष्टी त्या झाडाखाली घडल्या होत्या. शेतात काम सुरू असले की याच्या सावलीतच विसावा मिळायचा, मुले लहान असताना बिनघोर याच्या सावलीत झोपायची, कितीतरी जत्रा झाल्या तिथे. हे झाड म्हणजे या कुटुंबाचा एक भाग होतं.

​एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एखाद-दुसरा आंबा पिकायला लागायचा. खारी, वटवाघळे पिकलेले आंबे खायचे. त्यांचे अर्धवट खाल्लेले आंबे खाली पडलेले असायचे. तेव्हा आता सगळ्या आंब्याला पाड आल्याचे मारुतीला कळले.

​त्या दिवसापासून मारुती मोठ्या आंब्याजवळ, उसाच्या राखणीला केलेल्या खोपीत झोपायला जाऊ लागला. सोबत कुत्रं पण यायला लागलं. अंथरूणाची एक वळकट त्या खोपीत आता नेहमीच दिसायला लागली. ऊस मोठा होता तेव्हा त्याचा बाप इथे राखणीला यायचा. रानगवे आले की उसाची मोडतोड करून खाऊन जायचे. तेव्हाही राखण करावी लागे. बांधावरच्या झाडाला बांधलेली काचेची बाटली आणि एक खिळा वारा आला की 'खणखण' वाजायचा. एखादा शेणकुटाचा वरळा (शेणाचं लांबट केलेलं शेणकुट) पेटवून आणलेलं असे. तो रात्रभर धुमसत राही. मारुतीचा राखणीचा हा दिनक्रम आता सुरू झाला.

​(क्रमश:)


- प्रा. सागर डवरी