स्पर्धा परीक्षेचा श्रीगणेशा: 'फाउंडेशन' अभ्यासाची गुरुकिल्ली

कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ माहितीचा साठा नसून, तो विषयांच्या आकलनाचा खेळ आहे. घाईघाईने अभ्यासाचा डोंगर उपसण्यापेक्षा, सुरुवातीचे काही महिने शांतपणे आपला पाया मजबूत करण्यासाठी द्यावेत.

Story: यशस्वी भव: |
25th April, 11:13 pm
स्पर्धा परीक्षेचा श्रीगणेशा: 'फाउंडेशन' अभ्यासाची गुरुकिल्ली

यू​पीएससी, एमपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या सागरात उडी घेताना, अनेक उमेदवारांच्या मनात 'नेमकी सुरुवात कुठून करावी?' हा मोठा प्रश्न असतो. या परीक्षेचा आवाका पाहता अनेकदा आपण थेट प्रगत आणि जाडजुड संदर्भांकडे वळतो, परंतु यशाचे खरे रहस्य हे पायाभूत अभ्यासात दडलेले असते. ज्याला आपण 'फाउंडेशन' म्हणतो, तोच या परीक्षेचा खरा कणा आहे. सिव्हिल सर्विसेसच्या तयारीमध्ये अभ्यासाचा गाभा समजून घेण्यासाठी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतची शालेय पाठ्यपुस्तके वाचणे अनिवार्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रामुख्याने NCERT प्रमाणित पुस्तकांचा आधार घेतला जातो. ही पुस्तके वाचण्यासाठी साधारण ४ ते ६ महिन्यांचा वेळ पुरेसा असतो. शालेय पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विषयांची मांडणी अत्यंत सोप्या, ओघवती आणि रंजक पद्धतीने केलेली असते. यामुळे कठीण वाटणारे विषयही सहज आत्मसात होतात. या प्राथमिक वाचनादरम्यान स्वतःची टिपणे काढण्याची सवय लावल्यास, मुख्य परीक्षेच्या वेळी उजळणी करणे सोपे जाते.

विषयनिहाय नियोजन

अभ्यासाची सुरुवात करताना प्रथम इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान यांसारख्या सामाजिक आणि मूलभूत विज्ञानांच्या विषयांना प्राधान्य द्यावे. आजवरच्या यशस्वी उमेदवारांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, ज्यांनी या विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर भर दिला, त्यांनाच प्रगत स्तरावरील प्रश्न सोडवणे सोपे गेले. एकदा का या विषयांचा गाभा नीट समजला, की मगच प्रगत संदर्भ ग्रंथांना हात लावावा. पायाभूत विषय वाचून पूर्ण झाल्यावर गणिताच्या सरावाकडे वळावे. स्पर्धा परीक्षेतील 'सी-सॅट' (CSAT) किंवा इतर पूर्व परीक्षांमध्ये गणिताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी सरावाची अत्यंत गरज असते. गणितातील लसावि, मसावि, पायथागोरसचे प्रमेय यांसारख्या मूलभूत घटकांवर प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे. तसेच, विज्ञानातील मापन पद्धती जसे की MKS आणि CGS पद्धती समजून घ्याव्यात. अनेकदा परीक्षेमध्ये वेग, वेळ आणि अंतर यांवर आधारित प्रश्न असतात. अशा वेळी किलोमीटर प्रति तासचे मीटर प्रति सेकंदात रूपांतर करणे किंवा अन्य कन्वर्शन्स पटकन जमल्यास वेळेची मोठी बचत होते.

परीक्षाभिमुख दृष्टिकोन आणि नकाशा वाचन

या सर्व अभ्यासाचा थेट फायदा पूर्व परीक्षेतील जनरल स्टडीज पेपर १ आणि पेपर २ मध्ये दिसून येतो. भूगोल विषयाचा अभ्यास करताना भारत आणि जगाचा नकाशा सतत सोबत ठेवावा. नकाशाच्या अभ्यासामुळे भौगोलिक स्थान, नद्या, डोंगररांगा आणि हवामान या गोष्टी केवळ वाचून लक्षात ठेवण्यापेक्षा पाहून लक्षात ठेवणे अधिक सोपे जाते. नकाशा अभ्यासाचा फायदा इतिहासातील घटनांचे स्थान समजून घेण्यासाठीही होतो. तसेच, इतिहासाचा अभ्यास करताना घटनांची कालक्रमानुसार मांडणी करावी. महत्त्वाचे सन, तारखा आणि ऐतिहासिक घटनांचे तक्ते तयार करून ते नजरेसमोर ठेवल्यास पाठांतराचा ताण कमी होतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ माहितीचा साठा नसून, तो विषयांच्या आकलनाचा खेळ आहे. घाईघाईने अभ्यासाचा डोंगर उपसण्यापेक्षा, सुरुवातीचे काही महिने शांतपणे आपला पाया मजबूत करण्यासाठी द्यावेत. जोपर्यंत पाया भक्कम होत नाही, तोपर्यंत त्यावर यशाची इमारत उभी राहू शकत नाही. म्हणूनच, शालेय पुस्तकांचा हा प्रवास यशाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी ठरतो.


- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा

(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)