​चविष्ट आणि झणझणीत: गोवन स्टाईल चिकन सुक्के

Story: चमचमीत रविवार |
25th April, 11:26 pm
​चविष्ट आणि झणझणीत: गोवन स्टाईल चिकन सुक्के

​मांसाहारी जेवणात चिकनचे विविध प्रकार बनवले जातात, पण ओल्या खोबऱ्याचा आणि खमंग मसाल्यांचा वापर करून बनवलेले 'चिकन सुक्के' याची चव काही वेगळीच असते. ही रेसिपी चपाती, भाकरी किंवा वड्यांसोबत अप्रतिम लागते.

​साहित्य:

​५०० ग्रॅम चिकन (स्वच्छ धुऊन घेतलेले)

​२ मोठे कांदे (बारीक चिरलेले)

​१ कप ओले खोबरे (खवून घेतलेले)

​१ मोठा टोमॅटो (बारीक चिरलेला)

​१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट

​२ टेबलस्पून गोवन गरम मसाला किंवा मालवणी मसाला

​अर्धा चमचा हळद

​१ चमचा लाल तिखट

​बारीक चिरलेली कोथिंबीर

​तेल आणि चवीनुसार मीठ

​कृती:

प्रथम चिकनला हळद, मीठ आणि थोडी आलं-लसूण पेस्ट लावून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवा. एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात खवलेले ओले खोबरे तांबूस होईपर्यंत भाजून घ्या आणि त्याची मिक्सरमधून जाडसर पेस्ट तयार करा.

​आता दुसऱ्या एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतायला टाका. कांदा मऊ झाला की त्यात उरलेली आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता. त्यानंतर त्यात लाल तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा. आता मॅरिनेट केलेले चिकन कढईत घालून ५-१० मिनिटे झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या. चिकनला स्वतःचे पाणी सुटते, त्यामुळे वेगळे पाणी घालण्याची गरज भासत नाही.

​चिकन अर्धवट शिजत आले की, त्यात भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण घाला. सर्व मिश्रण नीट एकत्र करून मध्यम आचेवर चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत ठेवा. मसाल्याचा सुवास सुटला आणि चिकन कोरडे झाले की गॅस बंद करा. वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. तुमचे गरमागरम आणि झणझणीत चिकन सुक्के तयार आहे!


- शिल्पा रामचंद्र मांद्रे