
भयकथा, रहस्यकथा, गूढकथा हा साहित्यविश्वातला तसा दुर्लक्षित प्रांत. नारायण धारप, रत्नाकर मतकरी, श्रीपाद नारायण पेंडसे इत्यादी अशी मोजकी नावे सोडली, तर फारसे कोणी या प्रांतात फिरकलेले नाही; गोव्यातही असा कोणी क्वचितच आढळेल. असे असताना 'शापित' हा डॉ. किशोरी पै व प्रा. महेश पै या दांपत्याने लिहिलेला कथासंग्रह भय, रहस्य आणि गूढकथा प्रेमींसाठी उत्कंठावर्धक मेजवानीच ठरतो.
या कथासंग्रहात एकूण सोळा कथा समाविष्ट आहेत. या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या केवळ भयाच्या विळख्यात न राहता, काही मानवी गैरसमजांमधून उगम पावल्या आहेत. तसेच यात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न मुळीच केलेला नाही. या कथा केवळ मनोरंजन करणाऱ्या आणि वाचकांचे कुतूहल वाढवणाऱ्या आहेत. या कथांची भाषा अगदी साधी, सरळ आणि प्रत्येक वर्णन उत्सुकता वाढवणारे आहे. यात गरीब, मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू वर्गाचे चित्रण आहे. खोर्ली, पणजी, मडगाव, मेरशी, गोवा रेडिओ केंद्र, मुंबई या ठिकाणांचा यात उल्लेख येतो. थोड्याफार कोकणी शब्दांची आणि संवादांची रेलचेलही यात पाहायला मिळते.
'प्लॅंचेट' या कथेने कथासंग्रहाची सुरुवात होते. उच्चभ्रू राहणीमान असणाऱ्या महाविद्यालयीन तरुणी, त्यांना असणारा प्लॅंचेटचा नाद आणि त्यातून एका रहस्याला फुटणारी वाचा, यावर ही कथा आधारित आहे. 'खुनी गुप्तधन' ही कथा लालसेपोटी एका निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या प्रेमी युगुलावर रेखाटली आहे. 'काळोखी निशा' यात 'टॅक्सीडर्मी' या विशिष्ट कलेची आणि सर्वसाधारणपणे भयकथांमध्ये मांडल्या जाणाऱ्या 'व्यॅम्पायर' या कल्पनेवर आधारित मांडणी केली आहे. 'डबल मर्डर केस' ही निरुपद्रवी भ्रम निर्माण करणाऱ्या भुतांविषयीचे रहस्य उलगडणारी कथा आहे.
कुणाच्या तरी नजरचुकीने चुकीचा निकाल दिल्यानंतर हकनाक जीव गमावलेल्या तरुणाची व्यथा 'समुद्रातील गोंडस तरुण' या कथेत मांडली आहे. 'अनाकलनीय त्याग' ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या विचाराने झपाटलेल्या व शेवटी स्वतःच्या चुकीने दुर्दैवाने मृत पावलेल्या दामू या स्वातंत्र्यवीराची आहे. सौंदर्याच्या मोहापायी नैसर्गिक बहुमूल्य रूप गमावणाऱ्या सुकेशाची गोष्ट 'रहस्यमयी बोडकी' या कथेतून रेखाटली आहे. विषकन्येने कल्पकतेने केलेल्या खुनाची उकल म्हणजे 'अज्ञात खूनी' ही कथा. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणातून जन्मलेल्या मुलावर अन्याय करून स्वतःच्या मुलाला संपत्ती देऊ बघणाऱ्या आणि स्वतःच्याच करणीने दुर्दैवी ठरलेल्या वहिनीबाईंची दयनीय कहाणी म्हणजे 'शापित'.
एका कष्टाळू मात्र निष्पाप जीवाच्या मृत्यूनंतरच्या 'झपाटणे' या संकल्पनेवर आधारित सूडकथा म्हणजे 'वेताळाचा भार'. स्वप्नदृष्टांत सदृश प्रसंगातून आपला खून झाल्याची माहिती आपल्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याची तळमळ 'गुलाबांचा ताटवा' या कथेतून दिसून येते. केवळ पाऊस आणि अंधार यामुळे न दिसू शकलेली व्यक्ती अचानक समोर आल्याने, तिला पिशाच समजून हकनाक जीवाला मुकल्याची हकीकत 'शवपेटी' या कथेत रेखाटली आहे. अनोळख्या जागी भाडेकरू म्हणून आलेल्या नरेंद्रला तापाच्या ग्लानीत एका मुलीचा चेहरा भिंतीवर दिसू लागतो; एक दिवस ती स्वतः त्याच्यासमोर येते मात्र तो भिंतीविषयी काही सांगत नाही, आणि अचानक तिचा भिंतीवर दिसणारा चेहरा एक दिवस रक्ताळलेला दिसतो व त्यानंतर दिसेनासा होतो, असा कोड्यात टाकणारा शेवट असणारी कथा म्हणजे 'विलक्षण अनुभव'.
प्रेमात पडून भिन्न समाजात लग्न झालेल्या तरुणीला सासरचा जाच सहन करावा लागतो, एवढेच काय तर स्वतःच्या मुलीला माहेरी ठेवावे लागते. शिकलेली असूनही लोकलाजेस्तव ती सगळा त्रास सहन करते; माहेरचे लोकही तिची अवस्था माहिती असून सहकार्य करत नाहीत. शेवटी ती जीव सोडते आणि तिचे प्रेत घरात असेपर्यंत घडणारा नाटकी प्रकार तिचा आत्मा कथन करतो, असे हृदयद्रावक चित्रण लेखकांनी 'चिंतनाच्या प्रवासाकडे' या कथेतून केले आहे. आई-वडिलांच्या दबावामुळे लग्न केलेल्या बायकोने आत्महत्या केल्यामुळे 'सुंठीवाचून खोकला गेला' अशा प्रकारची भावना जोपासणाऱ्या निर्दयी नवऱ्याचे चित्रण 'फॅंटास्टिक' या कथेत केले आहे.
ब्लॅकमेलिंगच्या जोरावर पैसे उकळणारा बदमाश कसा जीवाला मुकतो व एक निवृत्त डी.एस.पी. चाणाक्षपणे त्याच्या खुनाची उकल करून स्वतःची मुक्तता कशी करून घेतात, याचे रंजक वर्णन म्हणजे 'ब्लॅकमेल' ही कथा होय. भयकथेचा प्रकार असूनही कुठेही किळसवाणे किंवा रक्तरंजित वर्णन न करता, खुमासदार शैलीत जिज्ञासावर्धक लेखन करणे ही या कथासंग्रहाची खासियत म्हणता येईल. भय, रहस्य, थरार आणि गूढकथा प्रेमींनी या रहस्यमय खजिन्याचा आस्वाद नक्कीच घ्यावा..!
कथासंग्रह : शापित, लेखिका-लेखक : डॉ. किशोरी पै व प्रा. महेश पै

- अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा