जादुई अंगठी (भाग -१)

गेल्या आठवड्यात आपण वाचलात, एका दयाळू मुलाने साप, कुत्रा आणि मांजराचे प्राण वाचवले. सापाने दिलेल्या जादुई अंगठीच्या बळावर त्याने राजकन्या आणि साम्राज्य मिळवले, परंतु म्हातारीने ती चोरून शेजारच्या राजाला दिली. अखेर इमानी कुत्रा आणि मांजराने आपल्या चातुर्याने ती अंगठी पुन्हा मिळवून मालकाला सुखी केले.

Story: भरजरी |
25th April, 11:20 pm
जादुई अंगठी (भाग -१)

​इकडे म्हातारी अंगठी घेऊन थेट त्या शेजारच्या राजाकडे गेली. अंगठी राजाच्या हातात देऊन म्हातारी म्हणाली, “राजा, तो मुलगा ह्या अंगठीच्या बळावर सगळं काही प्राप्त करतो. मी मोठ्या चतुराईने ही अंगठी चोरून आणली. आता ही अंगठी तुमच्या हवाली करते.” राजा म्हातारीवर खुश झाला. त्याने लगबगीने म्हातारीकडून ती अंगठी आपल्याकडे घेतली. तिला भले मोठे बक्षीस दिले आणि रवाना केले. त्यानंतर ती अंगठी त्याने आपल्या महालातील पेटीत सुरक्षितपणे ठेवून दिली.

इकडे मुलगा आपली अंगठी नाही हे पाहून हैराण झाला. सर्वत्र शोधाशोध करूनही अंगठी मिळाली नाही आणि म्हातारीही कुठे दिसली नाही; त्यामुळे तो समजून चुकला की अंगठी म्हातारीनेच चोरून नेली. मुलगा फार दुःखी झाला. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही.

आपला मालक असा संकटात सापडला आहे, याचा मुलाच्या घरी असलेल्या कुत्रा आणि मांजर यांना दृष्टांत झाला. पहाटे पहाटे मांजर आणि कुत्र्यामध्ये खानाखुणा झाल्या. दोघेही तडक मालकाची वाट काढत सातासमुद्रापार असलेल्या महालात पोहोचले. तिथे मुलाने घडलेली सर्व हकीकत आपल्या परमप्रिय मित्र कुत्र्या-मांजराला सांगितली. कुत्र्याने आणि मांजराने मुलाला वचन दिले की, ती अंगठी ते दोघे मिळून परत आणतील. आल्या पावली ते शेजारच्या राज्यात पोहोचले.

तिथे कुत्रा आणि मांजराने बघितले की, त्या राजाने अंगठी आपल्या महालात एका लाकडी पेटीत सुरक्षित ठेवली आहे. रात्र झाली. कुत्र्याला त्या पेटीपर्यंत पोहोचता येईना. आता अंगठी मिळवावी कशी? मांजराने युक्ती काढली. त्या दिवशी उंदरांचे नाटक होते. नाटक बघायला सगळे उंदीर जमले होते. नाटक सुरू होण्यापूर्वीच मांजर तिथे गेले आणि म्हणाले, “माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना बोलवीन आणि आत्ताच्या आत्ता सर्व उंदरांचा फाडसा पाडीन.” सगळे उंदीर गडबडले, घाबरून गेले. "आम्हाला खाऊ नको" म्हणून ते गयावया करू लागले. मांजर म्हणाले, “ठीक आहे. एका शर्तीवर मी तुम्हाला सोडते.”

“काय काम आहे सांगा, आम्ही करू. पण आम्हाला खाऊ नका.” उंदीर म्हणाले.

“ठीक आहे, या नगराच्या राजाच्या महालामध्ये एक लाकडी पेटी आहे. त्या पेटीत एक अंगठी आहे. तुम्हाला तिथे जाऊन ती अंगठी मिळवून आणायची आहे.”

“हात्तीच्या... एवढेच? हा तर आमच्या डाव्या हाताचा खेळ आहे!” असे म्हणून सगळे उंदीर महालाच्या दिशेने निघाले. उंदरांनी महालाच्या भिंती पोखरून भुयार केले. भुयारातून सगळे उंदीर आत गेले. आत ती लाकडी पेटी होती. एका उंदराने ती कुरताडायला सुरुवात केली. पेटी सहज कुरतडली गेली. उंदरांनी पेटीमधून अंगठी बाहेर काढली आणि ती कुत्रा व मांजराच्या हवाली केली.

कुत्रा आणि मांजर खुश झाले. मांजराने अंगठी तोंडात धरली. कुत्रा आणि मांजर समुद्रकिनारी आले. कुत्र्याला समुद्रामध्ये सहज पोहता येत असल्याने मांजर त्याच्या पाठीवर चढले. कुत्र्याने समुद्रात उडी टाकली. कुत्रा सहजतेने पोहत होता आणि मांजर आरामात कुत्र्याच्या पाठीवर बसले होते. समुद्र पार करता करता मांजराने सहज खाली नजर टाकली. मांजराने बघितले की समुद्राच्या पाण्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे मासे फिरत होते. ते मासे बघून मांजराच्या तोंडाला पाणी सुटले. मांजराने आशेने ‘म्याऊ’ करण्यासाठी तोंड उघडले आणि त्याच क्षणी मांजराच्या तोंडातली ती अंगठी टपकन पाण्यात पडली. पोहणाऱ्या माशांपैकी एकाने ती पटकन गिळली. मांजराला मोठा पश्चात्ताप झाला. हावरेपणामुळे आपण मौल्यवान गोष्ट हरवल्याचे त्याला फार दुःख झाले. मांजराने कुत्र्याला अंगठीबद्दल सांगितले. कुत्र्यालाही वाईट वाटले. आता काय करावे? कुत्रा विचार करत असतानाच त्याला समुद्रकिनारी उदमांजर (हुद) दिसले. कुत्र्याला युक्ती सुचली.

कुत्रा समुद्रकिनारी गेला आणि मोठ्याने भुकत ओरडला, “माझ्या सगळ्या मित्र कुत्र्यांना बोलवेन आणि इथे असलेल्या सर्व उदमांजरांचा नायनाट करीन.” सगळी उदमांजरे घाबरली आणि कुत्र्याभोवती गोळा झाली. "आम्हाला खाऊ नका" म्हणून ती गयावया करू लागली. कुत्रा म्हणाला, “ठीक आहे, मी एका अटीवर तुम्हाला मारणार नाही. आमची एक मौल्यवान अंगठी या समुद्रातील माशाने गिळली आहे. ती अंगठी जर तुम्ही मला आणून दिली, तर मी तुम्हाला काहीही करणार नाही.” उदमांजरांनी कुत्र्याची अट मान्य केली. उदमांजरांचा मोरक्या माशांच्या मोरक्याकडे जाऊन म्हणाला, “तुमच्यापैकी कोणीतरी एकाने माझ्या मित्र कुत्र्याची अंगठी गिळली आहे. ज्याने ती गिळली आहे, त्याने बाहेर यावे आणि ती अंगठी द्यावी. जर ती अंगठी मिळाली नाही, तर आम्ही सगळी उदमांजरे मिळून तुम्हा सगळ्या माशांना खाऊन टाकू.” माशांचा नायक सुद्धा घाबरला. त्याने हा संदेश सगळ्या माशांपर्यंत पोहोचवला. काही क्षणांतच अंगठी गिळलेला मासा पुढे आला. त्याने ती अंगठी कुत्र्याच्या आणि मांजराच्या पुढे ओकली. अशा प्रकारे कुत्र्या-मांजराला जादुई अंगठी पुन्हा मिळाली.

आता पुन्हा मांजराने अंगठी तोंडात धरली. "एवढे खटाटोप करून मिळवलेली अंगठी पुन्हा गमवायची नाही," असे मांजराने मनाशी ठाम ठरवले. कुत्र्यानेही अलगदपणे समुद्र पार केला.

महालाच्या दरवाज्यापाशी थांबून कुत्रा मोठमोठ्याने भुंकू लागला. महालाच्या आत बेचैन असलेल्या मुलाने आपल्या मित्र कुत्र्याचा आवाज बरोबर ओळखला. मुलगा लगबगीने बाहेर आला. आपल्या आवडत्या कुत्र्या आणि मांजराला बघून त्याने दोघांनाही आलिंगन दिले. त्यांना भरभरून प्रेम दिले. आता मांजर पुढे आले आणि त्याने आपल्या तोंडातील अंगठी मुलाच्या पायाजवळ ठेवली. हे पाहून मुलाला फार आनंद झाला.

कोणी एकेकाळी फक्त दया येऊन त्याने सापाचा, कुत्र्याचा आणि मांजराचा जीव वाचवला होता. आज त्या सापामुळेच तो मुलगा राजा झाला होता आणि कुत्र्या-मांजरामुळे आपली हरवलेली दिव्य अंगठी परत मिळवून पुन्हा एकदा त्याच्या भाग्याची कवाडे उघडी झाली होती.

कोणीतरी जे म्हटले आहे ते खरेच आहे – "आपण केलेले परोपकार कधीच वाया जात नाहीत." ​(समाप्त)


गाैतमी चाेर्लेकर गावस