अँटलायन

बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा आणि निसर्गातील एका विलक्षण पण छोट्या शिकारी कीटकाची, म्हणजेच ‘अँटलायन’ची (घाडी) रंजक माहिती सांगणारा हा विशेष लेख. एका चिमुकल्याच्या कुतूहलातून उलगडलेले हे 'घाडी'चे गुपित.

Story: साद निसर्गाची |
25th April, 11:16 pm
अँटलायन

खुद खुद घाडी, घाडीला बाहेर काडी(ढी)”, हे वाचून अनेकांना नक्कीच आपलं बालपण आठवलं असेल. वाळूसारखी माती, मातीतील तो लहान खोल खड्डा, एका सुरात ‘खुद खुद घाडी, खुद खुद घाडी’ म्हणत त्या खड्ड्यात गोल गोल फिरवलेली छोटीशी काठी, अन् काठी फिरवल्यानंतर खड्ड्यातून बाहेर पडलेला तो छोट्या आकाराचा अँटेनावाला कीटक! नॉस्टॅल्जिक व्हायला झालं ना? लिहिता लिहिता मलाही बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी आणि बहिणीची तर शर्यतच लागायची, ‘बघू कोणाला जास्त घाडी मिळतात ते. ज्याला जास्त घाडी मिळेल तो जिंकेल’.

इयत्ता चौथीत शिकणारा माझा भाचा उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवण्यासाठी परवा घरी आलेला. म्हटलं चल तुला एक गंमत दाखवते, असं म्हणत मी त्याला परसबागेत घाडींचे खड्डे शोधायला घेऊन गेले. खड्डे दिसल्यानंतर मी त्याला खेळ समजावला अन् मी आणि बहीण खेळायचो तशीच शर्यत लावली, ‘बघू कोणाला जास्त घाडी मिळतात ते. ज्याला जास्त घाडी मिळेल तो जिंकेल’.

"ताई हे कीटक नेहमी असे मातीतच असतात का गं? मातीत असतात तर मग हे माती खाऊनच जगत असतील ना? की खाऊ आणण्यासाठी हे बाहेर फिरायला जातात?" मी उत्तर देणार त्याआधी तो दुसरा प्रश्न विचारून मोकळा झाला. प्रश्न ऐकून मला खरंतर त्याचं फारच कौतुक वाटलं. किती ती उत्कंठा! अन् तीसुद्धा निसर्गाशी निगडित विषयाची. मी आनंदाने त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

‘अँटलायन' (Antlion) हा कीटक लहान, गोलसर आकाराचा असतो. हा बहुधा वाळूसारखा तपकिरी रंगाचा असतो. याचे शरीर जाड पण खूप मऊ असते. मोठे डोके व पुढे दोन वक्र जबडे. मुलांमध्ये अँटलायनची अळी ‘घाडी’ या नावानेच जास्त प्रचलित आहे. उन्हाळ्यात हा कीटक खोल खड्डा खणून भक्षकाच्या प्रतीक्षेत कोरड्या वाळूत किंवा मातीत खोलवर लपून बसतो. छद्मवेष धारण केल्यामुळे हा भक्षकाच्या नजरेत येत नाही.

अँटलायनचे जीवनचक्र चार टप्प्यांत असते: अंडी, अळी, कोश व शेवटी प्रौढ कीटक. अंडी घातल्यानंतरचा टप्पा म्हणजे अळी. प्रौढ मादी योग्य जागा शोधून तिथे अंडी घालते. काही दिवसांनी त्यातून अळी बाहेर येते. ही अळी वाळूत गोल फिरत खोल आणि घसरडा खड्डा बनवते व खड्ड्याच्या तळाशी लपून बसते. जेव्हा एखादी मुंगी किंवा लहान कीटक त्या खड्ड्यात पडतो, तेव्हा तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तळाशी लपून बसलेली अळी अचूकपणे वाळू फेकते. त्यामुळे शिकार पुन्हा खड्ड्यात घसरते. शिकार खाली पोहोचताच ही अळी आपले सुईसारखे टोक असलेले जबडे उघडून भक्ष्य पकडते व त्याच्या शरीरातील रस शोषून घेते. काही दिवसांनंतर अळी स्वतःभोवती एक कोश तयार करते. अळी अनेक आठवडे किंवा महिने अन्नाशिवाय जिवंत राहू शकते. अळी हा अँटलायनच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त काळ सक्रिय असणारा टप्पा. आश्चर्य म्हणजे अळ्यांना गुदद्वार नसते; त्यामुळे अँटलायन आपल्या अळी अवस्थेत निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ शरीराच्या आतच साठवून ठेवतात. प्रौढ अवस्थेत रूपांतरित झाल्यानंतर हा पदार्थ बाहेर टाकला जातो. कोरडी, वाळूसारखी माती, झाडांच्या सावलीत किंवा भिंतीजवळ यांचे वसतिस्थान असते.

प्रौढ अँटलायन दिसायला थोडासा ड्रॅगनफ्लायसारखा असतो. प्रौढ टप्प्यात हा कीटक उडू शकतो. लांब व नाजूक शरीर, जाळीसारखे मोठे दोन पारदर्शक पंख व लांब अँटेना ही त्यांची वैशिष्ट्ये. हा सहसा रात्री अधिक सक्रिय असतो. अळीच्या तुलनेत याचे प्रौढ आयुष्य छोटे असते. यांचा प्रौढ अवस्थेतील उद्देश मुख्यतः प्रजनन करून पुढील पिढी वाढवणे हाच असतो. अत्यंत संयमी शिकारी असलेली अँटलायनची अळी पर्यावरणात कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करते.


- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)