वाचाळविरांना थारा नको!

काही धार्मिक प्रतिकांचा आदर करायचा नसेल, तर निदान जाहीरपणे अनादर तरी करू नये. गोव्यासारख्या बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक राज्यात हा शहाणपणा सगळ्यांनीच दाखवायला हवा. द्वेषाच्या बदल्यात द्वेषच पदरी पडतो. राजकीय नेते आणि धर्ममार्तंडांनी अशा वाचाळविरांना आवरायला हवे. एकमेकांची उणीदुणी काढून बखेडे वाढवत बसण्यापेक्षा असा सामाेपचार आणि एकोपा स्वीकारणे हिताचे नाही का? दोन्ही बाजूच्या उठावळांनी यावर विचार नक्की करायला हवा.

Story: वर्तमान |
25th April, 11:33 pm
वाचाळविरांना थारा नको!

गो​व्यात येऊन कितीही दारू ढोसून तसेच बेताल वागले तरी चालते, अशी एक चुकीची धारणा बिगरगोमंतकीयांत असते. तीच धारणा हल्ली गोव्याबाहेरील काही व्यक्तींची इथल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्तराच्या बाबतीत बनली आहे. इथल्या समाजात विष कालवायचे प्रयत्न आडमार्गाने होतच असतात. ते उघडपणे करण्याचे पाप गौतम खट्टर नावाच्या यूट्यूबरने केले. त्याची ओळख यूट्यूबर अशी करून देण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात आक्रमक आणि एकांगी धार्मिक प्रचार आणि त्या अनुषंगाने विद्वेषाला खतपाणी घालण्याचे कार्य तो नेटाने चालवत असल्याचे दिसून येते. गोव्यात येण्यापूर्वी त्याचे असे अनेक उपद्व्याप पचून गेले होते. पण इथे आल्यानंतर घडले उलटे. भाषण तर थांबवावे लागलेच, शिवाय त्यानंतर गोव्याबाहेर पलायन, अटक चुकविण्यासाठी लपून बसण्याची नामुष्की आणि सरतेशेवटी अटकेची कारवाई अशी त्याची पळताभुई थोडी झाली.

हा पहिला परिच्छेद वाचल्यानंतर कित्येकांना मिरच्या झोंबून प्रस्तुत लेखकाला शिव्याशाप देण्याची इच्छा नक्कीच होईल. कारण हल्लीचे वातावरणच इतके विखारी आणि एकांगी बनले आहे की, पोक्त विचारही व्यक्त करण्याचे धाडस करताना विचार करावा लागतो. परधर्मीय हे जणू या देशात राहायच्या लायकीचेच नाहीत, एक तर त्यांनी पूर्वधर्मात प्रवेश ​करावा किंवा देश सोडून चालते व्हावे, असा टाेकाचा आग्रह उघडपणे धरला जातो. अशांना राजकीय आशीर्वादही मिळतो. त्यामुळे कट्टरतावाद्यांची झुंड अधिकच आक्रमक होते आणि समतेचे, प्रगल्भतेचे वैश्विक विचार मांडणाऱ्यांना धर्मद्रोही म्हणण्याइतकी मजल या लोकांची जाते. जुनी मढी उकरायची आणि समाजात वादाच्या वावटळी उठवायच्या हा यांचा आवडता उद्याेग. त्यासाठी तशा विचारांच्या लोकांची एक फौजच देशभरात जुंपण्यात आली आहे. त्यातीलच एक गौतम खट्टर. तो गोव्यात आला, नव्हे हेतूपुरस्सर ‘आणला गेला’. वास्कोतील टिळक मैदानावर परशुराम जयंती कार्यक्रमात सनातन धर्माविषयी त्याने बोलावे, अशी अपेक्षा ठेवून म्हणे त्याला निमंत्रित केले होते. तसा दावा आयोजकांनी केला आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, जगभरात कुतूहलाचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या सनातन धर्माच्या श्रेष्ठतेविषयी असे वक्ते न बोलता, दुसऱ्या धर्मातील प्रवृत्तींवर टीका करण्यात धन्यता मानतात. समोरचा जमावही त्यांना चिथावणी देतो आणि हा द्वेषाचा वणवा उत्तरोत्तर पसरतच जातो. त्याचीच एक ठिणगी वास्कोत खट्टरच्या विधानामुळे पडली आणि नंतर अनपेक्षितपणे पेटलेल्या जनक्षोभाच्या वणव्याची त्याच्या ‘बोलवित्या धन्यां’सोबतच राज्य सरकारलाही झळ बसली. विशेष म्हणजे खाजवून खरूज काढण्याच्या या प्रकाराचा अनेक हिंदूंनीही निषेध केला. त्यामुळे खट्टरचे समर्थन करणार्‍यांची पंचाईत झाली. 

पोर्तुगिजांच्या काळात गोव्यात इ. स. १५६० सालापासून सुरू झालेले हिंदू, मुस्लिमांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचे ‘इन्क्विझिशन’ हा खचितच भयंकर, अमानुष प्रकार होता. त्याबाबत हिंदू समाज पोर्तुगिजांना कदापि माफ करणार नाही. या प्रक्रियेला ख्रिस्ती धर्मोपदेशक फ्रान्सिस झेवियर यांनी चालना दिली, असे इतिहासातील नोंदी सांगतात. हेच फ्रान्सिस झेवियर मृत्यूनंतर ‘सेंट फ्रान्सिस झेवियर’ किंवा ‘गोंयचो सायब’ या नावाने ओळखले जाऊ लागले. बहुसंख्य हिंदूंच्या मनात खरी अढी इथेच आहे. जी एका अर्थाने रास्तच आहे. इ. स. १८१८ मध्ये ‘इन्क्विझिशन’ बंद करण्याचा फतवा लिस्बनहून जारी झाला आणि त्यानंतर १९६१ साली पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून लावण्यात आले. नंतरच्या काळात मांडवी, जुवारी, कुशावती, साळ आणि इतर ओढ्या-नाल्यांतूनही बरेच पाणी वाहून गेले. तब्बल चार शतकांपासून ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले मूळचे हिंदू लोक पक्के ख्रिस्ती बनले होते. किंबहुना त्यांची हिंदू समाजासोबतची नाळ तुटली होती. ती हळूहळू जुळत गेली ‘इन्क्विझिशन’ बंद पडल्यानंतर. आता ना ख्रिस्ती धर्म त्यागण्यात अर्थ होता, ना तशी कोणाला गरज वाटत होती. त्यामुळे समाजाचे हे दुभंगलेले दोन तट धार्मिक पातळीवर दुभंगलेलेच राहिले. धार्मिक उन्मादाचा अतिरेक थंडावल्यानंतर इतिहासातील वेदना विसरून लोक एकोप्याने नांदू लागले. ​हिंदू पूर्वजांच्या धार्मिक सणांत ख्रिस्तींनी सहभागी व्हायचे आणि ख्रिस्तींच्या सणांना हिंदूंनी हातभार लावायचा, अशी सोपीसाधी धाटणी गोव्याच्या बहुतांश लोकांनी स्वीकारली. अजूनही ती बर्‍याच प्रमाणात टिकून आहे. पण त्याला कट्टरतेचे गालबोट दोन्हीकडच्या उपटसुंभांनी लावण्याचा प्रयत्न अधूनमधून करून पाहिला. काही वेळा त्यांना यश आलेही, पण बहुतेक वेळा सामोपचाराने हा प्रकार दुर्लक्षिला गेला. अलीकडच्या काही वर्षांत मात्र या द्वेषमूलक कृतींनी कळस गाठला आहे. गौतम खट्टरने सेंट फ्रान्सिस झेवियर यांना जाहिरपणे ‘दहशतवादी’ संबोधणे ही त्याची परि​सीमा होती.

गोव्यात खूप कमी असे धर्माभिमानी आहेत की, जे उघडपणे अशी भाषा बोलण्याचे धाडस करतात. पण तेही हातचे राखून. कारण इथली सामाजिक रचना त्यांना तसे करू देत नाही. मग आपल्या मनातील ही खदखद बाहेर काढण्यासाठी खट्टरसारख्या लोकांचा त्यांना आधार वाटतो. मात्र या प्रकरणात ख्रिस्ती समुदायाने अनपेक्षितपणे चढाई करून सरकारपक्षासह सर्वांनाच सामोपचाराची, नरमाईची भूमिका स्वीकारण्यास भाग पाडले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून या कार्यक्रमाच्या आयोजकांनी चक्क जाहीरपणे लेखी माफी मागून आपले अंग झटकले. भाजप नेत्यांसह कोणीही खट्टरच्या विधानाचे समर्थन केले नाही. त्यामुळे त्याला परागंदा हाेऊन दडून बसावे लागले. सेंट फ्रान्सिस झेवियर हा विषय इतका गंभीरपणे घेतला जाईल, याचा काेणालाच अंदाज नव्हता. त्यामुळे आगामी ​विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ध्रुवीकरण वगैरे करण्याच्या उद्देशाने असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी प्रत्येक जण नक्कीच घेईल, अशी आशा आहे. कारण हा प्रकार जनमताचा कानोसा घेण्यासाठी जाणीवपूर्वक 'प्रयोग' म्हणून केला असावा, अशीच दाट शक्यता आहे. हा प्रकार पचून गेला असता, तर त्याच्या किती तरी आवृत्त्या पुढे होत राहिल्या असत्या! 

यानि​मित्ताने आक्रस्ताळी, टोकाच्या विचारसरणीचे किळसवाणे दर्शन घडले. एकाने चूक केली की​ जणू काय आपणही त्याचीच री ओढायला हवी, अशी अहमहमिका सोशल मीडियावर दिसून आली. त्यातून काही ख्रिस्तींकडून हिदूंच्या देवतांवर टिप्पण्या केल्या गेल्या. हे प्रकार पोलिसांत तक्रार नोंदवण्यापर्यंत गेले. अशा नाजूक आणि संंवेदनशील प्रसंगी लोकप्रतिनिधी, धर्मोपदेशकांनी सबुरीचा सल्ला देण्याची गरज असते. तसे क्वचितच घडताना दिसले. कितीही मतमतांतरे असली, तरी सेंट फ्रान्सिस झेवियर हे गोव्यासह आसपासच्या ख्रिस्तींच्या श्रद्धेचे सर्वोच्च प्रतिक आहे. आजच्या घडीला ही गोष्ट मान्य करूनच पुढे जायला हवे. ओल्ड गोव्याच्या फेस्ताला बहुतांश हिंदू नेते आणि अनेक हिंदू धर्मीयसुद्धा हजेरी लावतात. राजकीय अपरिहार्यता असो वा अन्य काही, ओल्ड गोव्याला राजकीय नेते नाही गेले, तर वेगळा संदेश जाऊ शकतो. हे काही सेंट झेवियर यांच्या बाबतच घडते असे नाही. काल-परवा पार पडलेल्या शिरगावच्या श्री लईराई जत्रेला अनेक ख्रिस्ती नेत्यांनी दरवर्षीप्रमाणे उपस्थिती लावून दर्शनही घेतले. त्या आधी म्हापशाच्या मिलाग्रीस चर्चच्या फेस्तात अनेक हिंदूंनी तेल अर्पण केले. एकमेकांची उणीदुणी काढून बखेडे वाढवत बसण्यापेक्षा असा सामाेपचार आणि एकोपा स्वीकारणे हिताचे नाही का? दोन्ही बाजूच्या उठावळांनी यावर विचार नक्की करायला हवा. इतिहासात होऊन गेलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी आजच्या घडीला द्वेषाची गरळ ओकून काहीच साध्य होणार नाही. त्यातून सामाजिक तेढ वाढून पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढतो. धार्मिक पातळीवर अशा ऐतिहासिक गोष्टींविषयी नक्कीच प्रबोधन करायला हवे. नव्या पिढीला खऱ्या इतिहासाचे बाळकडू पाजायला हवे. आपल्या पूर्वजांनी भोगलेल्या यातनांची ओळख त्यांना करून द्यायला हवी. त्याचबरोबर त्या वेदनांच्या खपल्या आज उकरून काढून समाज नासवण्याच्या विचारांपासून दूर ठेवायला हवे. कार त्या बदल्यात द्वेषच पदरात पडेल. 

‘काही प्रश्न सोडून दिल्यामुळे सुटतात’ असे एक सुंदर वाक्य आहे. काही वेळा काही गोष्टी मान्य करून पुढे जाण्यात शहाणपण असते. शिवराय-शंभूराजेंचे गोव्याविषयी कर्तृत्व नाकारणाऱ्या ख्रिस्तींनी आणि सेंट झेवियरविषयी वादंग घडवणाऱ्यांनी गौतम खट्टर प्रकरणातून हा धडा घ्यायला हवा. कोणाचा आदर करायचा नसेल, तर निदान अनादर तरी करू नये. खट्टर प्रकरणानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हाच संदेश दिला आहे. तो सर्वांनी लक्षात घेऊन आपापल्या धर्मातील वाचाळविरांना लगाम घालायला हवा. सोशल मीडियावर व्यक्त होताना जबाबदारीचे भान राखायला हवे. गोव्याची ओळख सर्वधर्म समभाव राखणारे राज्य अशी आहे. तिला द्वेषाची टाचणी लावायचा कद्रूपणा कोणी करू नये!


- सचिन खुटवळकर

(लेखक गोवन वार्ताचे वृत्त संपादक अाहेत.)