हिंदू बांधवांची मागणी : वास्को पोलीस स्थानकाला घेराव

वास्को : सोशल मीडियावर हिंदू देवदेवतांबद्दल अवमानकारक मजूकर प्रसारित करून हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी हिंदू बांधवांनी शनिवार, दि. २५ रोजी एकत्र येऊन संबंधितांना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली. याप्रसंगी उपस्थितांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला.
काही व्यक्तींनी फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर हिंदू देव देवतांसंबंधी अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याने येथील हिंदू बांधवांनी शनिवारी वास्को पोलीस स्थानकासमोर जमा व्हावे, असे आवाहन समस्त हिंदू धर्मप्रेमी गोवाने केले होते. यामुळे वास्को पोलीस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष जमा झाले होते. त्यांनी संबंधित व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली. संबंधित कोठे लपले असतील तर त्यांना तेथून ताब्यात घ्या, अशी मागणी उपस्थितांनी केली. याप्रकरणी वास्को पोलिसांना निवेदन देण्यात आले.
गौतम खट्टर यांच्याशी संबंधित अलिकडील वाद प्रकरणानंतर काही व्यक्ती गोव्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंदू देवतांसंबंधी अपमानजनक आणि अश्र्लील मजकूर प्रसारित करीत आहेत. हे लोक जाणीवपूर्वक हिंदूच्या धार्मिक भावनांना लक्ष्य करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सर्व समुदायांच्या धार्मिक भावनांचे रक्षण करण्यासाठी गोवा पोलीस तातडीने कारवाई करतील, असा विश्र्वास व्यक्त करण्यात आला.
वास्को पोलिसांनी कारवाई करावी!
निवेदनात संबंधित व्यक्तींची नावे तसेच त्यांनी कोणत्या देवदेवतांवर मजकूर लिहिला याबाबत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी दखल घेऊन संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.