बार्देश : ग्रामसभांना पंच उपस्थित न राहिल्यास मानधन नाही!

सिरसई ग्रामसभेत ठराव : ग्रामस्थांकडून टिकेची झोड

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
just now
बार्देश : ग्रामसभांना पंच उपस्थित न राहिल्यास मानधन नाही!

थिवी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले पंच पहिल्या एक-दोन ग्रामसभांना उपस्थित राहतात व नंतर ग्रामसभांना उपस्थित राहत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील ग्रामस्थांच्या समस्या सुटण्यास अडथळा येत असल्यामुळे अशा पंचांचे मासिक मानधन अडवून ठेवावे. जोपर्यंत ते ग्रामसभांना उपस्थित राहत नाहीत, तोपर्यंत त्यांचे मानधन देऊ नये, असा ठराव सिरसई ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला. या ठरावाची प्रत गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत संचालक व पंचायतमंत्र्यांना पाठवावी, असा ठराव घेण्यात आला.

ग्रामसभेत सरपंच तेजा कानोळकर, उपसरपंच रुपेश मडगावकर, सचिव गोविंद खलप व ग्रामसभा निरीक्षक करिश्मा साळगावकर उपस्थित होत्या, तर पंच सिमरन उसकईकर, गोकुळदास कानोळकर, राजाराम पार्सेकर, दया फडते, सावळो मांद्रेकर गैरहजर राहिले.

ग्रामसभा तीन महिन्यांनी एकदा होते. या ग्रामसभेला सरपंच व उपसरपंच यांच्याव्यतिरिक्त पंच उपस्थित नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या शिवाय पंचायतीद्वारे साजरे करण्यात येणारे स्वातंत्र्य दिन, गोवा मुक्तिदिन, प्रजासत्ताक दिन व इतर कार्यक्रमातसुद्धा सरपंचांशिवाय इतर कोणीच पंच उपस्थित राहत नाहीत. सिरसई पंचायतीमध्ये यापूर्वी पंच उपस्थित राहत नसल्यामुळे दोन-तीन वेळा ग्रामसभा तहकूब करून नंतर घेण्यास ग्रामस्थांनी भाग पाडले होते. तरीसुद्धा हे पंच उपस्थित राहत नाहीत.

सचिव खलप यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ऑडिट रिपोर्ट ग्रामसभेत मांडला असता, त्यात पंचायतीच्या अनेक चुका आढळल्या. आत्माराम कळणेकर यांनी ऑडिट रिपोर्टमध्ये असलेल्या चुकांबाबत सरकारने पंचायत संचालकाद्वारे चौकशी करून यावर कारवाई करावी, असे सुचविले.

विद्याधर भगत यांनी सिरसई ग्रामपंचायत क्षेत्रात कोमुनिदादच्या जमिनीत बांधलेल्या घर मालकांकडून घरपट्टी वसूल करण्यात येत नसेल, तर त्यांच्याकडून कचरा कराच्या रुपात पैसे घ्यावेत, असे सुचविले. हेमंत कांबळी यांनी कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती देणारा फलक लावावा, अशी सूचना केली.

लक्ष्मीकांत कामत यांनी थिवी रेल्वे स्टेशनजवळील बेकायदेशीर गाळ्याविषयी प्रश्न उपस्थित केला व सदर गाळा कोर्टाच्या अादेशानुसार दोन वेळा पाडण्यात अाला होता, तरीही पुन्हा उभारण्यात आला असून यावर कारवाई करण्याची मागणी केली.
मनोज हळदणकर यांनी भार प्रकट केले.

गैरहजर राहणाऱ्यांकडून खर्च वसूल करा!
एक ग्रामसभा घेण्यासाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च होतो, असे सचिव गोविंद खलप यांनी सांगितले. यावर, सदर खर्च ग्रामसभांना उपस्थित न राहणाऱ्या पंचांकडून वसूल करावा, असेही ठरविण्यात ले.

हेही वाचा