वेळ्ळी येथे उष्माघाताने त्रस्त गायीला सतर्क नागरिकामुळे जीवदान

वेळीच उपचार केल्याने गायीचे वाचले प्राण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24 mins ago
वेळ्ळी येथे उष्माघाताने त्रस्त गायीला सतर्क नागरिकामुळे जीवदान

मडगाव : वेळ्ळी-कारशेत या परिसरात उष्माघाताने त्रस्त असलेल्या गायीला स्थानिक नागरिक, दक्षिण गोवा प्राणी क्रूरता प्रतिबंध समितीचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि ध्यान फाउंडेशनच्या सहकार्यातून जीवदान देण्यात आले.
वेळ्ळीतील नागरिक वालेंतिन डिसिल्वा यांनी घराकडून दुकानाच्या दिशेने जाताना खुल्या जागेत गाय आडवी पडलेली पाहिली. त्यांनी गाडी थांबवून जवळ जाऊन पाहिले असता, गाय हालचाल करत होती. त्यांनी दक्षिण गोवा प्राणी क्रूरता प्रतिबंध समितीचे राज प्रतीक यांना या घटनेची माहिती दिली.


उष्माघातामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या या गायीची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांसह राज प्रतीक यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. या गायीच्या बचाव कार्यात कुंकळ्ळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी रॅन्स्ले यांच्यासह ध्यान फाउंडेशनच्या पथकाने सहकार्य केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी गायीची तपासणी करून लगेच सलाईन लावले. सर्व संस्था आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गायीवर वेळीच उपचार सुरू करण्यात आले, ज्यामुळे तिचे प्राण वाचू शकले.

हेही वाचा