म्हाऊस-वाळपई येथे स्थानिकाच्या नळाच्या पाण्यात ‘टेपवर्म’सदृश्य जीव; परिसरात घबराट

जलवाहिनीच्या पाहणीत काहीच आढळले नाही; एकाच घरात समस्या : पेयजल खाते

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
33 mins ago
म्हाऊस-वाळपई येथे स्थानिकाच्या नळाच्या पाण्यात ‘टेपवर्म’सदृश्य जीव; परिसरात घबराट

वाळपई : म्हाऊस-वाळपई (Valpoi)  येथील स्थानिकाच्या नळाच्या पाण्यात 'टेपवर्म'सदृश्य जीव आढळल्याने परिसरात घबराट पसरली. त्यानंतर पेयजल खात्याच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाण्याचे नमुने घेतले. या परिसरातील जलपुरवठा वाहिनीची पाहणी करून पू्र्णपणे साफ करण्यात आली. मात्र, त्यात काहीच आढळले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

नळाच्या पाण्यात (Tap Water) ‘टेपवर्म’सदृश्य जीव सापडल्याची माहिती मिळताच पेयजल खात्याने (Department of Drinking water) या परिसरातील जलपुरवठा बंद केला. त्यानंतर पाहणी करण्यासाठी एक पथक या‌ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पूर्ण पेयजलपुरवठा वाहिनीची पाहणी करून नंतर साफ केली. मात्र, वाहिनीत असे काही जीव आढळले नाहीत.

जलपुरवठा करण्यात येत असलेल्या जलवाहिनीच्या पाण्यात ‘क्लोरीन’ (Chlorine)  टाकण्यात येत असल्याने; असे जीव सापडूच शकत नसल्याचे पेयजल पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ एकाच घरातील पाण्यात जीव आढळले असून, तेथेच काही समस्या असू शकते; असे त्यांनी सांगितले. तेथील पाण्याचे नमुने घेतले असून, चाचणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान; याठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा