
मडगाव : भाजप सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींना पद्धतशीरपणे कमकुवत केले आहे. ग्रामसभा तसेच लोकांचे आवाज दाबले जात असून, स्थानिक लोकांच्या मतांना केराची टोपली दाखवली जात आहे. लोकशाहीत पंचायतींची मुस्कटदाबी सहन करणार नाही, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
पंचायत राज दिनानिमित्त आमदार सरदेसाई यांनी राज्यातील पंचायतींचे अधिकार काढून घेत त्यांना कमकुवत केल्याचा आरोप सरकारवर केला. सरदेसाई म्हणाले की, सत्ताविकेंद्रीकरणाची प्रक्रिया केवळ कागदावरच उरली असून, लोकांना केवळ अधिकार असल्याचे सांगण्यात येते; पण प्रत्यक्षात अधिकारांची पायमल्ली करण्यात येत आहे. लोकांच्या अधिकारांचे रूपांतर केवळ औपचारिकता म्हणून उरले आहे. हे केवळ धोरणात्मक अपयश नसून राज्याच्या सामूहिक निर्णय प्रक्रियेवरील व परंपरेवरील हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्य सरकारकडून पंचायतींच्या अधिकारावर गदा आणून विश्वासघात केला जात आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. राज्यातील लोकांनी व पंचायतींनी सामूहिक निर्णय प्रक्रियेचा अभिमान बाळगला आहे, पण सध्याचे सरकार ही पाळेमुळे खोदून काढत असल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाहीच्या या पायमल्लीविरोधात आता आम्ही गप्प बसणार नाही. राज्यातील गावे व लोकही आता जागे होतील. लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे देण्यात आलेले हक्क मिळवण्यासाठी निश्चितपणे आवाज उठवला जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले.