अनंत अंबानींचे कोलंबिया सरकारला पत्र; ८० हिप्पोंना जीवदान देण्यासाठी मदतीचा हात

जामनगर/कोलंबिया: कुख्यात ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबारच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील ज्या हिप्पोंनी सध्या कोलंबिया सरकारची झोप उडवली आहे, त्यांच्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक आणि 'वनतारा'चे संस्थापक अनंत अंबानी देवदूत बनून धावून आले आहेत. कोलंबिया सरकारने या वाढत्या हिप्पोंच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल ८० प्राण्यांना मारण्याची (Culling) योजना आखली होती. मात्र, अनंत अंबानी यांनी कोलंबिया सरकारला पत्र पाठवून या सर्व प्राण्यांना जामनगर येथील 'वनतारा' या जागतिक दर्जाच्या संवर्धन केंद्रात आश्रय देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

'कोकेन हिप्पो' हे नाव कसे पडले ?
१९८० च्या दशकात पाब्लो एस्कोबारने आपल्या 'हॅसिएन्डा नेपोल्स' या आलीशान इस्टेटवर हौसेपोटी काही हिप्पो आणले होते. पोलिसांपासून सुरक्षित राहावे म्हणून पाब्लो अमलीपदार्थाचे साठे जलाशयात पाण्याखाली किंवा जलाशयाजवळ ठेवायचा, जेणेकरून नदीनाल्यांमार्गे ते दुसरीकडे जलदगतीने नेता येतील. त्यातील कोकेनसारखे अनेक ड्रग्ज या हिप्पोंनी खाल्ले व त्यांना यांची चटक लागली. पुढे हेच हिप्पो 'कोकेन हिप्पो' म्हणून प्रसिद्ध झाले. हे हिप्पो इतर हिप्पोंपेक्षा मोठे आणि जास्त आक्रामक आहेत. अशी एक अफवा गेली अनेक पॉप कल्चरमध्ये प्रचलित आहे.

एस्कोबारच्या मृत्यूनंतर हे प्राणी मॅग्डालेना नदीच्या खोऱ्यात नैसर्गिकरित्या वाढले आणि आज त्यांची संख्या २०० च्या आसपास पोहोचली आहे. कोलंबिया सरकारने २०२२ मध्ये या प्राण्यांना 'आक्रमक उपरी प्रजाती' (Invasive Species) म्हणून घोषित केले. कारण, त्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक परिसंस्था, पाणी आणि मानवी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. कोलंबियाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अंदाजानुसार, जर आताच नियंत्रण मिळवले नाही, तर २०३५ पर्यंत ही संख्या १००० पार जाऊ शकते.
या संकटावर उपाय म्हणून कोलंबियाने ७.२ अब्ज पेसो खर्च करून ८० जलहस्तींना मारण्याची तयारी सुरू केली होती. ही बातमी समोर येताच अनंत अंबानी यांनी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री आयरीन वेलेझ टोरेस यांना पत्र लिहून एक पर्याय सुचवला. अंबानी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "या ८० हिप्पोंनी कुठे जन्माला यायचे हे ठरवले नव्हते. हे सजीव प्राणी असून जर आपल्याकडे त्यांना वाचवण्याची क्षमता असेल, तर ती आपली जबाबदारी आहे." त्यांनी या प्राण्यांना गुजरातमध्ये आणून त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखेच वातावरण असलेल्या वनतारा केंद्रात 'जीवनभराची' काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे.

अनंत अंबानी यांनी स्थापन केलेले 'वनतारा' केंद्र १५०,००० हून अधिक प्राण्यांचे घर आहे. या केंद्रात तज्ज्ञ पशुवैद्यक, अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था आणि प्राण्यांच्या कल्याणासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अंबानी यांनी कोलंबिया सरकारला विनंती केली आहे की, जोपर्यंत भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय प्राधिकरणांकडून आवश्यक मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत या प्राण्यांना मारण्याचा निर्णय स्थगित ठेवावा. सध्या मेक्सिको, पेरू आणि फिलीपिन्ससारख्या इतर देशांचाही विचार सुरू असला, तरी अंबानी यांच्या प्रस्तावामुळे भारताचे नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर जगातील हा सर्वात मोठा प्राणी स्थलांतर प्रकल्प ठरू शकतो.