चाप्रा आणि भांगडसह अनेक संवेदनशील भागांतून सकाळपासूनच समोर आल्या हिंसाचाराच्या घटना.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या मतदानाला हिंसाचार, ईव्हीएममधील बिघाड आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे गालबोट लागले आहे. राज्यातील चाप्रा, शांतीपूर आणि भांगड यांसारख्या अनेक भागांतून सकाळपासूनच हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत.
मतदान सुरू होताच चाप्रा, शांतिपूर आणि भांगर यांसारख्या संवेदनशील भागांतून हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. हावडा जिल्ह्यात काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांच्या रांगा लांबल्या होत्या. दरम्यान, एंटाली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रियंका टिब्रेवाल आणि मतदान केंद्र अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. मतदान केंद्रात जागा नसल्याचे कारण देत भाजपच्या पोलिंग एजंटला बाहेर काढल्याने हा वाद विकोपाला गेला.
एंटली विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रियांका टिब्रेवाल आणि निवडणूक अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. टिब्रेवाल यांच्या प्रतिनिधीला मतदान केंद्राबाहेर काढल्याने हा वाद उद्भवला. केंद्राची जागा लहान असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रतिनिधीनेही वादात उडी घेतल्याने तणाव वाढला आणि अखेर दोघांनाही बाहेर काढण्यात आले. "आतमध्ये बटण दाबण्यासाठी दहा लोक बसले आहेत," असा संताप टिब्रेवाल यांनी यावेळी व्यक्त केला.
मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच ५.३० दरम्यान छपरा विधानसभा मतदारसंघातील हतरा पंचायत क्षेत्रात भाजपचे पोलिंग एजंट मोशर्रफ मीर हे आपल्या बूथकडे निघाले होते. यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या गुंडांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी सळ्या आणि बंदुकीच्या सहाय्याने त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच छपरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मीर यांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात तातडीने छपरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. केंद्रीय दले भाजपच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय सुरक्षा दले आमच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. अशा वातावरणात निवडणुका होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी आपला संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाने राज्यातील वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांवरूनही ममता बॅनर्जींनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने बाहेरून 'निरीक्षक' आणून निवडणूक प्रक्रियेत फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.
दुसऱ्या टप्प्यातील या हाय-व्होल्टेज मतदानात हिंसाचाराच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.