ज्या कोर्टात आरोपी म्हणून उभे राहिले, तिथेच आता वकील बनून लढणार!

३१ वर्षांच्या संघर्षातून कायद्याची प्रेरणा

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
7 hours ago
ज्या कोर्टात आरोपी म्हणून उभे राहिले, तिथेच आता वकील बनून लढणार!

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात ३१ वर्षे तुरुंगवास भोगलेले ए. जी. पेरारिवलन यांनी सोमवारी तामिळनाडू आणि पुद्दुचेरी बार कौन्सिलमध्ये 'वकील' म्हणून नोंदणी केली. ज्या न्यायव्यवस्थेत तीन दशके त्यांनी आरोपी, दोषी आणि अपीलकर्ता म्हणून संघर्ष केला.

जून १९९१ मध्ये पेरारिवलन यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर हत्येच्या कटात सामील असल्याचा आणि बॅटरी पुरवल्याचा आरोप होता. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, मे २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम १४२ चा वापर करून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या सुटकेमागे त्यांची आई अरपुथम अम्माल यांचा ३१ वर्षांचा अथक संघर्ष आणि पाठपुरावा मोठा आहे. अम्माल यांनी १९९१ पासून तामिळनाडूच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता.

या प्रकरणाला मोठी कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा सीबीआयचे निवृत्त अधिकारी व्ही. त्यागराजन यांनी २०१३ मध्ये एक धक्कादायक खुलासा केला. पेरारिवलन यांनी बॅटरी खरेदी केली होती, मात्र ती कशासाठी वापरली जाणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती, ही कबुली आपण नोंदवताना 'वगळली' होती, असे त्यागराजन यांनी मान्य केले. या एका खुलाशामुळे पेरारिवलन यांच्या सुटकेच्या मागणीला मोठे बळ मिळाले होते.

५४ वर्षीय पेरारिवलन यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बेंगळुरू येथील डॉ. बी. आर. आंबेडकर लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. २०२५ मध्ये पदवी मिळवल्यानंतर त्यांनी 'ऑल इंडिया बार एक्झामिनेशन' उत्तीर्ण केली. आपल्या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले, मला फक्त वकील बनायचे नाही, तर कायद्याच्या मदतीअभावी तुरुंगात अडकलेल्या हजारो वंचित कैद्यांना न्याय मिळवून देणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे. 

ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेप्रमाणे भारतातही 'दोषमुक्तीनंतरचे कायदे' असावेत, जेणेकरून निर्दोष व्यक्तीला सन्मानाने जगता येईल, असे स्वप्न पेरारिवलन यांनी व्यक्त केले आहे. आरोपी ते वकील असा हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा