२०१९ च्या चिखलफेक प्रकरणात न्यायालयाने सुनावली शिक्षा

कणकवली : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांना २०१९ मधील बहुचर्चित ‘चिखलफेक’ प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने एक महिन्याचा कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी (कलम ५०४) त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
जुलै २०१९ मध्ये कणकवलीमधील महामार्गाच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. त्यावेळी नितेश राणे काँग्रेसमध्ये होते. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर शेडेकर यांनी मारहाण आणि चिखलफेक केल्याची तक्रार दिली होती.
या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह ४० जणांवर भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा), ३३२, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी कलम ३५३ आणि इतर गंभीर कलमांमधून सर्वांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, कलम ५०४ (शांतता भंग करणे) अंतर्गत नितेश राणे यांना दोषी ठरवत एक महिन्याची कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली.
उच्च न्यायालयात दाद मागणार
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नितेश राणे यांच्या वतीने शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आम्ही या निर्णयाविरोधात लवकरच उच्च न्यायालयात अपील (रिव्हिजन) दाखल करणार आहोत, अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.