युद्धविराम, संघर्षावर इराणची रशियाकडे चर्चा; तोडगा काढण्याची मागणी

रशियाने सुनावले अमेरिकेला खडे बोल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
युद्धविराम, संघर्षावर इराणची रशियाकडे चर्चा; तोडगा काढण्याची मागणी

सेंट पीटर्सबर्ग : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रशियात दाखल झाले असून; त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. या भेटीत प्रादेशिक शांतता, युद्धविराम आणि सुरू असलेल्या संघर्षावर उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराणला ब्लॅकमेल करून काही साध्य होणार नाही : रशिया

दरम्यान, रशियाने (Russia) अमेरिकेवर (USA) तीव्र टीका करत “इराणला (Iran) ब्लॅकमेल करून काही साध्य होणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. मॉस्कोने इराणच्या (Iran) भूमिकेला पाठिंबा दर्शवत संवाद आणि कूटनीतीद्वारे तोडगा काढण्यावर भर दिला आहे.

इराणी सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अराघची यांचा हा दौरा ओमान आणि पाकिस्तान दौऱ्यानंतर होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचा तेहरानचा प्रयत्न आहे. इराणने अमेरिकेसमोर एक “नवीन प्रस्ताव” मांडल्याचेही वृत्त असून, त्यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे आणि संघर्ष कमी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अणुकरारासंदर्भातील चर्चा सध्या पुढे ढकलण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अराघची यांचे विमान “मिनाब १६८” या कॉलसाइनने उडाले होते. हे नाव मिनाब शहरातील एका शाळेवर झालेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

पुतीन, अराघची मध्ये चर्चा 

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही या भेटीची पुष्टी करत, पुतीन आणि अराघची यांच्यात मध्यपूर्वेतील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच रशियातील इराणचे राजदूत काझेम जालाली यांनीही या चर्चांमध्ये युद्धविराम आणि चालू वाटाघाटींच्या प्रगतीवर भर दिला जात असल्याचे सांगितले.  मध्यपूर्वेतील संघर्ष सुरू झाल्यापासून मॉस्को आणि तेहरान यांच्यातील समन्वय वाढला असून, या भेटीतून तणाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा