
सुरत : प्रेम, विश्वास आणि १५ वर्षांच्या संसाराचा अंत अत्यंत क्रूरपणे झाल्याची घटना गुजरातच्या सुरत शहरात उघडकीस आली आहे. एका ४० वर्षीय नराधमाने आपल्या डायटिशियन पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह चक्क एका लाकडी पेटीत भरला आणि त्यावर कच्च्या सिमेंटचा थर ओतून तो जुन्या घरात लपवून ठेवला. विशेष म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने स्वतःच पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती. मात्र, एका चिठ्ठीने या हत्येचा उलगडा केला आहे.
संशयित विशाल साळवी (४०) याने त्याची पत्नी शिल्पा साळवी (३९) हिची २० एप्रिल रोजी हत्या केली. त्यानंतर त्याने अत्यंत थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्याचा कट रचला. त्याने शिल्पाचा मृतदेह सलाबतपुरा भागातील आपल्या एका जुन्या बंद घरात नेला. तिथे एका लाकडी पेटीत मृतदेह कोंबून, दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यावर सिमेंट ओतले आणि घराला कुलूप लावून तो निघून गेला.

हत्येनंतर विशालने गोडदरा पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलीस शोध घेत असतानाच, विशालने आपल्या अल्पवयीन मुलासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि तो स्वतः फरार झाला. या चिठ्ठीत त्याने "आपल्याकडून मोठी चूक झाली असून शिल्पा आता जिवंत नाही," अशी कबुली दिली होती. मुलाने ही चिठ्ठी पोलिसांच्या हवाली करताच तपासाची चक्रे फिरली.
चिठ्ठीतील माहितीनुसार, पोलिसांनी सलाबतपुरा येथील बंद घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश करताच पोलिसांना तीव्र दुर्गंधी आली. कोपऱ्यात असलेल्या लाकडी पेटीचा झाकण उघडले असता, तिथे सिमेंटच्या थराखाली शिल्पा यांचा कुजलेला मृतदेह आढळला. ही हत्या तक्रार देण्याच्या ४-५ दिवस आधीच झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

साळवी दांपत्य मागील १५ वर्षांपासून एकत्र होते. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात सतत घरगुती वाद होत होते. विशालला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलीस तपासात समोर आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी कानन देसाई यांनी सांगितले की, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक टीम पुराव्यांची तपासणी करत आहे.