दोनापावला, म्हापसात दरोडे घालणाऱ्या बांगलादेशींना दिल्लीतून गोव्यात आणणार

गुन्हा शाखेचे २२ सदस्यीय पथक दिल्लीला रवाना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
दोनापावला, म्हापसात दरोडे घालणाऱ्या बांगलादेशींना दिल्लीतून गोव्यात आणणार

पणजी : गोवा, कर्नाटक आणि दिल्लीसह अनेक राज्यांत चोऱ्या व दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोरांच्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी १२ दिवसांपूर्वी थरारक चकमकीनंतर नायनाट केला. दिल्ली पोलिसांनी गोवा पोलिसाच्या गुन्हे शाखेच्या माहितीवरून सहा अट्टल दरोडेखोरांना अटक केली होती.



हे सर्वजण म्हापसा, दोनापावला आणि फोंडा येथे झालेल्या मोठ्या दरोड्यांच्या प्रकरणांत गोव्याला 'मोस्ट वॉन्टेड' होते. गोव्याच्या गुन्हे शाखेने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी झाली. आता या ६ संशयितांना ट्रान्सफर वॉरंटवर गोव्यात आणण्यासाठी गुन्हा शाखेचे निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक किशोर रामानन यांच्यासह २२ जणांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. गुरुवारी, ३० एप्रिल रोजी या संशयितांना गोव्यात आणले जाईल.


6 months after Dempo house dacoity, cops make 1st arrest | Goa News - The  Times of India


दिल्लीतील सराय काले खान स्मशानभूमीजवळील जंगलात ही टोळी नवा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. १४ आणि १५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री पोलिसांनी या परिसराला वेढा घातला असता, सशस्त्र दरोडेखोरांनी पोलिसांवर थेट गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर देत पाठलाग करून सुमन हलदार, सैफुल इस्लाम, सोहेल शेख, मोहम्मद नासीर, नूर इस्लाम आणि झाकीर या सहा जणांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन दोन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्याचा शोध सुरू आहे.




दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अटकेत असलेले सर्व संशयित हे बांगलादेशातील बागेरहाट जिल्ह्याचे रहिवासी आहेत. हे दरोडेखोर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून एखाद्या राज्यात 'हिट' (दरोडा) मारत आणि त्यानंतर थेट बांगलादेशात जाऊन लपून (हाईड)बसत. शहरी गजबजाटापासून दूर वास्तव्यास राहणारे श्रीमंत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निशाण्यावर असत. प्रतिकार केल्यास ही टोळी हत्या करण्यासही मागे-पुढे पाहत नसत. या टोळीने गोव्यातील तीन प्रकरणांसह कर्नाटक, दिल्ली, केरळ आणि ओडिशामधील एकूण १४ मोठे गुन्हे कबूल केले आहेत.


Image

गोव्यातील गुन्ह्यांची पार्श्वभूमी:

१) दोनापावला: २० एप्रिल २०२५ रोजी एका बंगल्यात घुसून घरमालकांना बाथरूममध्ये कोंडून १ किलो सोने आणि ३ लाख रुपयांची लूट केली होती.

२) म्हापसा: ७ ऑक्टोबर २०२५ रोजी हाऊसिंग बोर्ड परिसरात ३५ लाखांची लूट करून तक्रारदाराची कार घेऊन हे आरोपी पसार झाले होते. 

३) फोंडा : येथील चोरी प्रकरणातही त्यांचा सहभाग आहे. 

बातमी अपडेट होत आहे. 
हेही वाचा