ग्रामसभेत ठराव संमत : दोन नवे कॅसिनोही बंद करण्याची मागणी

म्हापसा : कळंगुटमध्ये थाटलेल्या कॅसिनाेंमध्ये बेकायदेशीर कृत्ये सुरू असून, या कॅसिनो संस्कृतीला विरोध करणारा ठराव कळंगुट ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. शिवाय हल्लीच पंचायत घराजवळ तसेच गावातील एका ठिकाणी पार्किंगच्या सोयी अभावी सुरू झालेल्या दोन नवीन कॅसिनोही बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सरपंच जोजफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी २६ रोजी पंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा झाली. यावेळी पंचायत सदस्य, सचिव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत मॅन्यूएल कार्दोज यांनी कॅसिनोचा मुद्दा उपस्थित केला. कॅसिनोंना केवळ पंचतारांकित हॉटेल्समध्येच परवानगी असली तरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एक कॅसिनो स्वतंत्र व्यवसाय म्हणून कार्यरत झाला आहे. तर आणखी एक कॅसिनो अशा जागेत सुरू आहे. जिच्याबद्दल ती पंचतारांतिक असल्याचे दावे केले जातात. परंतु ती जागा खरोखरच पंचतारांकित दर्जाची आहे की नाही, याची स्पष्टता नाही.
अलीकडेच गुजरातच्या एका व्यक्तीची हत्या झाली होती. कॅसिनोमधून पळून गेल्यानंतरच त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच ज्या ठिकाणी केवळ स्लॉट मशीन्सद्वारे जुगाराचे खेळ चालवले जातात, अशा ठिकाणांना कॅसिनो म्हणून संबोधण्याची परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न कार्दोज यांनी उपस्थित केला. तसेच नव्याने सुरू झालेल्या एका कॅसिनोने जाहिरातींच्या उद्देशाने कळंगुट गावभर अनधिकृतरीत्या वाहतूक बॅरिकेड्स लावले आहेत, असा दावा त्यांनी केला.
या नव्याने सुरू झालेल्या कॅसिनोंना पार्किंगची जागा नसल्यामुळे ग्राहक रस्त्यांवरच आपली वाहने पार्क करतात. ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि इतर वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. शिवाय स्पा आणि समाज पार्लर्स बंद करण्याचे प्रयत्न करूनही त्यांचे कामकाज अजूनही कसे सुरू आहे, असे प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला जाब विचारला.
सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी सांगितले की, पंचायतीने संबंधित कॅसिनोंना त्यांचे कामकाज थांबवण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. परंतु, एखाद्या हॉटेलला पंचतारांकित दर्जाचे वर्गीकरण देण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्राबाहेरील विषय आहे, असे ते म्हणाले.
ग्रामसभेतील इतर महत्त्वाचे ठराव
- नगरनियोजन कलम ३९ अ अंतर्गत करण्यात आलेले जमिनीच्या वापराचे सर्व बदल फेटाळले.
- बोआ व्हिएगम टेकडीचे संरक्षण करून तिला विकास निषिद्ध क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय.
- टिटोस लेनमधील कचरा डेपो साफ करणे आणि समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सचा कचरा परबोवाडा येथील एमआरएफ केंद्रात वळवणे.
- गावात वाढलेले प्रचंड बांधकाम पाहता, गावच्या वहन क्षमतेचे मूल्यांकन करण्याची मागणी.