व्यावसायिक हतबल : कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी

हरमल : हरमल आणि मांद्रे किनारी भागात कर्नाटक तसेच अन्य राज्याबाहेरील ट्रॉलरच्या बेकायदेशीर मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमार बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारी खात्याचे धोरण आणि किनारी पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने या भागातील व्यावसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून गोव्याच्या सागरी हद्दीत शिरून मोठमोठ्या आकाराचे परप्रांतीय ट्रॉलर बिनदिक्कतपणे मासळीचा गाळ उपसून नेत आहेत. कोस्टल पोलिसांशी संपर्क साधला तरी अधिकारी पोहोचण्यापूर्वीच हे ट्रॉलर हद्दीबाहेर निघून जातात, त्यामुळे कारवाई शून्य असते, असे मत व्यावसायिक साक्रु डिमेलो यांनी व्यक्त केले. नाममात्र कारवाईमुळे परप्रांतीय व्यावसायिकांचे फावते आहे.
पर्यटन हंगाम आता उत्तरार्धात आहे, मात्र हॉटेल व्यावसायिकांच्या मागणीनुसार मासळीचा पुरवठा होत नाही. शीतगृहातील फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या भीतीमुळे अनेक खवय्ये समुद्रातील ताज्या मासळीला पसंती देतात. मात्र, परप्रांतीय ट्रॉलरच्या लुटीमुळे स्थानिक बाजारपेठेत ताज्या मासळीचा तुटवडा निर्माण झाला असून दर्जेदार मासळी दुर्लभ झाली आहे.
तेरेखोल सागरी पोलीस स्थानक हरमलपासून २० किमी अंतरावर असून या स्थानकाची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडे केवळ नदीत देखरेख करण्यासाठी छोटी बोट आहे, जी खोल समुद्रात टेहाळणी करण्यासाठी कुचकामी ठरते. आठवड्यातून एकदा येणाऱ्या मोठ्या बोटीचाही विशेष परिणाम दिसून येत नसल्याने मच्छीमारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
ग्रामीण भागातील मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी सरकारने बेकायदेशीर ट्रॉलरवर कठोर बंदी घालावी आणि स्थानिकांना उत्पन्नाची हमी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक मच्छीमारांची आर्थिक कोंडी
गेल्या १५ दिवसांपासून स्थानिक मच्छीमारांचा व्यवसाय पूर्णपणे नुकसानीत आहे. यांत्रिक बोटींसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने व्यावसायिक इझाबेल रॉड्रिग्ज आणि इतरांनी चिंता व्यक्त केली आहे. पेट्रोलचा खर्च, कामगारांचा पगार आणि जाळ्यांचा खर्च निघणेही आता कठीण झाले असून, बँकांचे अधिकारी वसुलीसाठी संपर्क करत असल्याने मच्छीमार दुहेरी संकटात सापडले आहेत.