धार्मिक भावना दुखावल्याचा नागरिकांचा आरोप; संबंधितांवर कडक कारवाईची मागणी

पणजी : गौतम खट्टर प्रकरणावरून गोव्यात सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असतानाच, आता काहींनी सोशल मीडियावर हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसिद्ध केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात वास्को येथील नागरिकांनी पोलीस स्थानकात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक प्रक्षोभक मजकूर पसरवून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीत काही विशिष्ट सोशल मीडिया युजर्सच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यक्तींनी हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील कमेंट्स केल्या असून, धार्मिक कार्यक्रमांच्या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यानही आक्षेपार्ह साहित्य शेअर केले आहे. गौतम खट्टर याच्या अटकेनंतर उद्भवलेल्या वादाचा फायदा घेऊन काहीजण जाणीवपूर्वक प्रक्षोभक पोस्ट करत असल्याचे नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अशा कृत्यांमुळे केवळ धार्मिक भावनाच दुखावल्या जात नाहीत, तर गोव्यातील शांतता आणि सामाजिक सौहार्द धोक्यात येण्याची शक्यताही तक्रारदारांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी या तक्रारीद्वारे पोलिसांना विनंती केली आहे की, या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित दोषींवर लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सायबर गुन्हेगारीच्या या प्रकारांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक गुरुदास कदम यांनी आंदोलकांना शांत केले. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

वास्को पोलीस आता या प्रकरणाची तांत्रिक बाजू तपासून संबंधित सोशल मीडिया खात्यांची पडताळणी करत असून, लवकरच पुढील तपास प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शहरात ताणावाचे वातावरण असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.