देशाच्या तुलनेत गोव्यात वैद्यकीय उपचार कमी खर्चिक

एनएसएसओचा अहवाल : खर्चाच्या बाबतीत गोवा देशात दुसऱ्या स्थानी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 11:05 pm
देशाच्या तुलनेत गोव्यात वैद्यकीय उपचार कमी खर्चिक

पणजी : देशाच्या तुलनेत गोव्यातील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी कमी खर्च येतो. राज्यातील सरकारी रुग्णालयात भरती झाल्यावर सरासरी १,६३९ रुपये खर्च येतो. याची राष्ट्रीय सरासरी ७,०४२ रुपये इतकी आहे. या क्रमवारीत तामिळनाडू (१,३६४ रु.) पहिल्या स्थानी आहे.
केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातून ही माहिती मिळाली आली आहे. हे सर्व्हेक्षण जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. यामध्ये प्रसूती वगळता अन्य उपचारांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे.
एनएसएसओने देशभरातील ६.५१ लाख लोकांचे सर्वेक्षण केले होते. यानुसार वरील कालावधीत गोव्यातील ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात भरती झालेल्या व्यक्तीला सरासरी २,६७८ रुपये खर्च झाला होता. याची राष्ट्रीय सरासरी ७,३३० रुपये इतकी होती. उत्तर प्रदेश, पंजाब मध्ये हा खर्च अधिक होता. तमिळनाडू, ओडिशा येथे हा खर्च तुलनेने कमी होता.
गोव्यातील शहरी भागातील सरकारी रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना सरासरी १,०७७ रुपये खर्च आला. याची राष्ट्रीय सरासरी ६,४१३ रुपये होती. सरकारी रुग्णालयात भरती झाल्यावर कमी खर्च येण्याच्या क्रमवारीत गोव्यानंतर तिसऱ्या स्थानी ओडिशा (२,५६३ रु.) आहे. गुजरात (३,६८७ रु.), छत्तीसगड (३,९१४ रु.) येथेही हा खर्च कमी आहे. मणिपूर येथे हा खर्च सर्वाधिक म्हणजेच १६,००८ रुपये आहे. गोव्यातील खासगी रुग्णालयात भरती झाल्यावर सरासरी ६९,७७७ रुपये खर्च येतो. याची राष्ट्रीय सरासरी ५६,३४३ रु. आहे. खासगी रुग्णालयात अधिक खर्च येण्याच्या क्रमवारीत गोवा देशात तिसऱ्या स्थानी आहे. तमिळनाडू, सिक्कीममधील खासगी रुग्णालयातील खर्च तुलनेने अधिक आहे.
राज्यातील आऊट ऑफ पॉकेट खर्च कमी
अहवालानुसार राज्यात सरकारी रुग्णालयात भरती असताना आरोग्य विम्यात न बसणारे अन्य वैद्यकीय खर्च (आऊट ऑफ पॉकेट) देखील कमी आहेत. गोव्यात सरकारी रुग्णालयातील अन्य खर्च १,६३७ रुपये आहेत. याची राष्ट्रीय सरासरी ६,६३१ रुपये आहे. राज्यातील खासगी रुग्णालयात हाच खर्च सरासरी ६३,९५५ रुपये आहे.

हेही वाचा