आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गौतम खट्टरला अटक; शिरगावच्या लईराईचा जत्रोत्सव उत्साहात

पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याला अटक करण्यात आली. शिरगाव येथील देवी लईराई जत्रोत्सव उत्साही वातावरणात झाला. हजारो धोंडांनी मध्यरात्री धगधगत्या कुंडातून अग्निदिव्य साकारले. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
सेंट झेवियर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पोलिसांत तक्रार
वास्को येथे आयोजित एका कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कुठ्ठाळीचे काँग्रेस नेते पीटर डिसोझा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत हा प्रकार घडणे अत्यंत लाजिरवाणे असून या प्रकरणी वक्ता गौतम खट्टर यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या तक्रारीतून केली आहे.
पर्रात विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
पर्रा येथे घराचा खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी एमसीबी तपासत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने सचिन धनसिंग राजपूत (२७) या युवकाचा मृत्यू झाला. सचिनच्या घराचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला होता. वीज का गेली हे पाहण्यासाठी तो एमसीबी बॉक्सची तपासणी करत होता. त्यावेळी त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला.

टिप्पर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
कुडचडेत रवींद्र भवनाच्या समोर रविवारी सकाळी ५.१५ वाजता झालेल्या अपघातात काऱ्यामड्डी काकोडा येथील स्कुटरस्वार जेस्वल डिनीज (१८) या युवकाचा मृत्यू झाला. जेस्वल डिनीज हा बाणावली येथे हॉटेलमधे काम करीत होता. रात्रपाळीची आपली ड्युटी करून जी. ए. ०९ क्यू १०९० या क्रमांकाची मोटरसायकल घेऊन आंबेडकर सर्कलहून आपल्या घरी जात होता.
सोमवार
सेंट झेवियरबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या खट्टरविरोधात गुन्हा
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गौतम खट्टर याच्याविरोधात वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार आंतोनियो वाझ यांनीही खट्टरच्या वक्तव्याचा निषेध करून कारवाईची मागणी केली आहे.
साळगाव येथील दुहेरी खूनप्रकरणी फरार आरोपीला ओडिशात अटक
मुड्डोवाडा-साळगाव येथे रिचर्ड डिमेलो व अभिषेक ऊर्फ सोनू गुप्ता यांचा खून झाला होता. या दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपी जगन्नाथ रामचंद्र भगत (मूळ सुंदरगड, ओडिशा) या गुन्हा शाखेने ओडिशात अटक केली आहे.
मोरजी येथे ४.८८ लाखांचा चरस जप्त, एक जण ताब्यात
मांद्रे पोलिसांनी मोरजी येथे केलेल्या कारवाईत एका नेपाळी नागरिकाला अटक केली. संशयिताकडून सुमारे ४८८ ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आला आहे. त्याची बाजारात किंमत ४ लाख ८८ हजार एवढी आहे.
केपेत विनापरवाना सोडा कारखान्यावर एफडीएचा छापा
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केपे येथील एका सोडा आणि शीतपेय उत्पादन युनिटवर छापा टाकून मोठी कारवाई केली. हा कारखाना कोणत्याही वैध परवान्याशिवाय आणि अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत चालवला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मंगळवार

शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रेस प्रारंभ
शिरगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीची जत्रा मंगळवारपासून सुरू झाली. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासन तयारीत गुंतले होते. पहिल्या दिवशी धार्मिक विधी, धोंडांचे पवित्र स्नान पार पडले.
‘डिजिटल अरेस्ट’द्वारे महिलेला ३३.५० लाखांचा गंडा
बार्देश तालुक्यातील एका ज्येष्ठ महिलेला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे भासवून बंगळुरू पोलीस स्थानकात मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा नोंद झाल्याचा दावा करून ‘डिजिटल अरेस्ट’ द्वारे ३३.५० लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोपार्डे सरकारी डेअरी फार्ममध्ये पुन्हा आग
गोवा पशु खात्याच्या कोपर्डे येथील सरकारी डेअरी फार्ममध्ये पुन्हा एकदा आग लागली असून सुक्या गवतासह जैविक संपत्ती आणि फार्ममधील पीव्हीसी पाईपचे नुकसान झाले. आगीत सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बुधवार
आक्षेपार्ह भाषण लिहिणाऱ्या माधव खट्टरला हरिद्वारात अटक
वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे ही कारवाई करण्यात आली.
शिरगावात हजारो व्रतस्थ धोंडांनी साकारले अग्निदिव्य
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील देवी लईराई जत्रोत्सव उत्साही वातावरणात झाला. हजारो धोंडांनी मध्यरात्री धगधगत्या कुंडातून अग्निदिव्य साकारले. हा सोहळा पाहण्यासाठी हजाराे भाविक शिरगावात दाखल झाले होते.

धारबांदोडा येथे मालवाहू ट्रक उलटला
देवसडो-धारबांदोडा येथील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मालवाहू ट्रक उलटला. कावासाकी नींजा दुचाकीची धडक बसण्याची शक्यता असल्याने ट्रकचालकाने रस्त्याच्या बाजूला ट्रक घेतला असता तो उलटला. तरीही दुचाकीची धडक ट्रकला बसली. अपघातात दोन्ही चालक सुखरूप असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
गुरुवार
खट्टरच्या अटकेसाठी वास्को पोलीस स्थानकावर मोर्चा
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारा गौतम खट्टर अद्याप पोलिसांना न सापडल्याने, ख्रिश्चन बांधवांनी वास्को पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. खट्टरला प्रमुख वक्ते म्हणून पाचारण करणाऱ्या आयोजन समितीविरोधात कारवाई का केली जात नाही, असा सवाल करत आंदोलकांनी पोलिसांना जाब विचारला.
टेम्पोला स्कुटरची मागून धडक बसून वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू
भोमा पंचायत समोरील राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोला मागाहून स्कुटरची धडक बसली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अॅड. संज्योत कामत (४६, कुंडई) यांचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
होंडा येथे घराला आग
नारायणनगर होंडा येथील नागनाथ यांच्या घराला गुरुवारी संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागनाथ यांच्या घराला सायंकाळी पाच वाजता लागलेली ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाने तत्काळ धाव घेत अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. मात्र, रात्री आठ वाजता पुन्हा एकदा त्याच घराला आग लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
शुक्रवार

गौतम खट्टरच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश
वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या कारच्या माहितीवरून गुन्हा शाखेच्या पथकाने हिमाचल प्रदेश पोलिसांच्या मदतीने खट्टरच्या मुसक्या आवळल्या.
६१.८४ लाखांना लुबाडणारा भामटा जेरबंद
मुंबई गुन्हा शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून आणि ‘पीएफआय’शी संबंध असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगून केपे तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला ६१.८४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने मोठी कारवाई करत आजरा-कोल्हापूर येथील दयानंद बाबूराव देवळकर (४८) या संशयिताला अटक केली.

शिवशंकर मयेकर याला एसआयटीकडून अटक
गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात संशयित शिवशंकर मयेकर याला अटक केली. त्याला बार्देश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
शनिवार
काणकोणमध्ये नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू
काणकोण तालुक्यातील वज्रे-भाटपाल येथे नदीवर फिरायला गेलेल्या तीन लहान मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तीन लहान मुले दुपारी घरच्यांची नजर चुकवून घराशेजारील नदीकाठी गेली होती. खेळता खेळता दोन मुले पाण्यात उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडली.
बाणावलीत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
बाणावली येथील वासवाडो भागातील एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर कोलवा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन व्यक्तींना रंगेहात पकडले असून, सुमारे २.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लक्षवेधी
बोब्रीमोड्डी-केपे येथील साळावली मुख्य कालव्यात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. केपे पोलिसांनी कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले असून ते मडगाव येथील शवागारात ठेवण्यात आले आहेत.
उसगाव पंचायतीचे पंच व काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मनीषा उसगावकर यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात करण्यात आली. मनीषा उसगावकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्याकडे केली.
खयरूट हळदोणा येथे सपना गावडे यांची राहती खोली आगीत जळून भस्मसात झाली. या दुर्घटनेत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून देवघरात लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागली.
हुबळीहून वास्कोच्या दिशेने येणाऱ्या वालांकिणी–वास्को एक्सप्रेसमध्ये एका ज्येष्ठ महिलेची बॅग चोरणाऱ्या २४ वर्षीय चोरट्याला वास्को रेल्वे पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. सावर्डे आणि चांदोर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये ही चोरीची घटना घडली होती.