एओएच गोवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

पणजीत असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ गोवातर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
पणजी : राज्यातील उद्योग तसेच अन्य क्षेत्रांनी कामाच्या ठिकाणी आरोग्य, सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करत आहे. ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
शनिवारी पणजीत असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ (एओएच) गोवातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजय आमोणकर, शिवानंद पांगम, डॉ. विश्वराज माशेलकर, डॉ. धर्मेश पारीख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांपासून कार्यालयांपर्यंत, बांधकाम स्थळांपासून प्रयोगशाळांपर्यंत, कामाच्या कोणत्याही ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करणे ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. राज्य सरकार औद्योगिक सुरक्षा चौकट मजबूत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. सरकार उद्योगातील उपकरणे सुरक्षा मानकांनुसार असल्याची खात्री करणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पद्धतींना प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रमांना पाठिंबा देणे अशी कामे करत आहे. उद्योग सर्वोच्च सुरक्षा मानकांसह कार्यरत राहतील याची खात्री आम्ही करत आहोत.
या संघटनेमुळे वैद्यकीय, व्यावसायिक,औद्योगिक तज्ञ आणि सरकारी अधिकारी एकत्रित एका मंचावर आले आहेत. सुरक्षित, टिकाऊ आणि भविष्यासाठी सज्ज कामाची जागा तयार करण्यासाठी हे सहकार्य महत्त्वाचे आहे. गोव्यातील अन्य उद्योगांनी देखील एओएच सारख्या संस्थांसोबत सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे. उद्योगांनी सर्वोत्तम पद्धती आत्मसात करून आरोग्य व सुरक्षा उपायांमध्ये गुंतवणूक करावी. विकसित भारत आणि गोवासाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षा असणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू
मुख्यमंत्र्यांनी यावेळी औद्योगिक बदलांच्या काळात आरोग्यदायी कार्यसंस्कृतीच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, विकासाचा विचार करताना पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक महत्त्वाची असतेच, परंतु या सर्वांच्या केंद्रस्थानी नागरिक असतो. जेव्हा कामगार सुरक्षित असतो, तेव्हाच तो आत्मविश्वासाने काम करू शकतो आणि त्यातूनच एक मजबूत अर्थव्यवस्था उभी राहते.