अग्निशमन दलाकडून लाखो रुपयांची मालमत्ता सुरक्षित; सुदैवाने जीवितहानी टळली

पणजी : सत्तरी तालुक्यातील वाळपई परिसरात आज सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी फणसाची झाडे कोसळून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. नाणूस येथे एका घरावर, तर वाळपई शहरात एका कारवर झाड पडल्याने सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवल्याने लाखो रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले.
पहिली घटना नाणूस-वाळपई येथील बेतकीकर वाडा येथे घडली. सकाळी ८:२५ च्या सुमारास विश्वनाथ गावकर यांच्या घरावर फणसाचे अजस्त्र झाड कोसळले. या दुर्घटनेत घराचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक परिश्रम करून झाड कापून बाजूला केले, ज्यामुळे घराची पुढील होणारी सुमारे १ लाख रुपयांची हानी टळली.
दुसरी घटना वाळपई शहरातील शंकर छाया बारच्या पाठीमागील भागात सकाळी ८:३० च्या सुमारास घडली. येथे विनायक वेळींगकर यांच्या मालकीच्या वॅगन-आर कारवर फणसाचे झाड पडले. या घटनेत कारचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच मदतकार्य राबवल्याने कारशेजारील सुमारे २ लाख रुपयांची मालमत्ता सुरक्षित बचावली.
तिसऱ्या घटनेत वाळपई-मासोर्डे रस्त्यावरील सुरेश पोकळे यांच्या घरातील बेकरीवर झाड पडून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने १ लाख रुपयाची मालमत्ता वाचविली. घरावरील पडलेले झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या तिन्ही मोहिमांमध्ये वाळपई अग्निशमन केंद्राचे अधिकारी एलएफएफ एस. के. नाईक, टी. एस. झर्मेकर, एफएफ जी. आर. देगवेकर आणि ए. ए. शेटकर यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला. पावसाळा पूर्व कामांची लगबग सुरू असतानाच घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, कमकुवत झाडे हटवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नाणूस परिसराला शनिवारी रात्री चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली. वीजपुरवठाही रात्री उशिरा[पर्यंत खंडित होता. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाणूस जंक्शनपासून गोशाळा रस्त्यापर्यंतच्या सुमारे एक किलोमीटर परिसरात जवळपास पंधरा ठिकाणी झाडे कोसळली. यापैकी दोन घरांवर झाडे पडल्याने त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आज आणि उद्या गोव्यात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.