हिमाचल मधून शुक्रवारी आवळल्या होत्या मुसक्या

पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करणारा संशयित गौतम खट्टर याला गोवा पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून अटक केल्यानंतर, गोवा क्राईम ब्रांचचे निरीक्षक परेश नाईक, पोलीस उपनिरिक्षक माधव नाईक आणि हवालदार नवीन पालयेकर यांच्या पथकाने त्याला तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर रविवारी दुपारी मोपा विमानतळावर आणले. आता त्याला रायबंदर येथील गुन्हा शाखेत आणण्यात आले आहे. कुल्लू, हैदराबाद आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करून पोलीस पथक संशयिताला घेऊन गोव्यात दाखल झाले.

रायबंदर येथे क्राईम ब्रांच बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दीडच्या सुमारास पोलिसांचे येथे आगमन झाले. पत्रकारांनी जेव्हा गौतमशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने 'सत्य की जीत' 'सत्यमेव जयते' असे म्हटले. दरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास गौतम खट्टर याला वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत नेण्यात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद शाधला असता त्याने सर्वांना उद्देशून 'सभी को जय श्री राम' असे म्हटले. पहा व्हिडिओ.
दुर्गम टेकडीवरील मठात लपला होता संशयित
गोव्यातून पसार झाल्यापासून गौतम खट्टर पोलिसांना सतत हुलकावणी देत होता. तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मराल येथील एका दुर्गम टेकडीवरील श्री नीळकंठ मंदिर परिसरातील एका घरात आश्रयाला असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हिमाचल पोलिसांनी मराल येथील चेक नाक्यावर सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्या कारच्या माहितीवरून गोवा क्राईम ब्रांचने हिमाचल पोलिसांच्या मदतीने २४ एप्रिल रोजी सायंकाळी ही कारवाई केली.
मोबाईल बंद करूनही तांत्रिक तपासाने लागला छडा
गोवा पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या पथकाने उत्तराखंड ते हिमाचल प्रदेश असा सलग पाठलाग केला. गौतमने आपला मोबाईल बंद ठेवल्याने माग काढणे कठीण जात होते, मात्र तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे स्थान निश्चित केले. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्याविरुद्ध यापूर्वीच 'लूक आऊट नोटीस' आणि अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले होते.
भाषण लिहून देणाऱ्या भावाला आधीच अटक
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला वास्को पोलिसांकडे होता, मात्र गांभीर्य ओळखून तो गुन्हा शाखेकडे (क्राईम ब्रांच) वर्ग करण्यात आला. तपासात असे निष्पन्न झाले की, गौतमचा भाऊ माधव खट्टर यानेच या कार्यक्रमाचे नियोजन केले होते आणि आक्षेपार्ह भाषणही त्यानेच लिहून दिले होते. यासाठी त्याने आयोजकांकडून ५१ हजार रुपये आणि लॉजिस्टिक व्यवस्थाही घेतली होती. पोलिसांनी माधवला आधीच हरिद्वारमधून अटक करून गोव्यात आणले आहे. दरम्यान गुरुवारी माधवला वास्को न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांची कोठडी समाप्त होत आहे.
बातमी अपडेट होत आहे..