हिमाचल प्रदेशात घेतले होते ताब्यात : आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ

पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करणारा संशयित गौतम खट्टर याला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने अटक करून गोव्यात आणले. यानंतर गौतमला वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्या. पूजा देसाई यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून अटक केल्यानंतर, गुन्हा शाखेचे निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक माधव नाईक आणि हवालदार नवीन पालयेकर यांच्या पथकाने गौतमला तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर रविवारी दुपारी मोपा विमानतळावर आणले. त्यानंतर त्याला रायबंदर येथील गुन्हा शाखेत आणण्यात आले. कुल्लू, चंदीगड, हैदराबाद आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करून पोलीस पथक गौतमला घेऊन गोव्यात दाखल झाले.
रायबंदर येथे गुन्हा शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दीडच्या सुमारास पोलिसांचे येथे आगमन झाले. पत्रकारांनी गौतमशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने ‘सत्य की जीत’, ‘सत्यमेव जयते’ असे म्हटले. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास गौतम खट्टर याला वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत नेण्यात आले. यावेळी पत्रकारांनी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने सर्वांना उद्देशून ‘सभी को जय श्री राम’ असे म्हटले.
गोव्यातून पसार झाल्यापासून गौतम पोलिसांना सतत हुलकावणी देत होता. तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मराल येथील एका दुर्गम टेकडीवरील श्री नीळकंठ मंदिर परिसरातील एका घरात आश्रयाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिमाचल पोलिसांनी मराल येथील चेकनाक्यावर सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्या कारच्या माहितीवरून गोवा पोलिसांनी हिमाचल पोलिसांच्या मदतीने २४ एप्रिल रोजी सायंकाळी ही कारवाई केली.
मोबाईल बंद असूनही तांत्रिक तपासाने लागला छडा
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या पथकाने उत्तराखंड ते हिमाचल प्रदेश असा सलग पाठलाग केला. गौतमने आपला मोबाईल बंद ठेवल्याने माग काढणे कठीण जात होते, मात्र कारच्या क्रमांक, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे स्थान निश्चित केले. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ‘लूक आऊट नोटीस’ आणि ‘अजामीनपात्र वारंट’ जारी करण्यात आले होते.
भाषण लिहून देणाऱ्या भावाला आधीच अटक
गौतमचा भाऊ माधव खट्टर यानेच या कार्यक्रमाचे नियोजन केले होते आणि आक्षेपार्ह भाषणही त्यानेच लिहून दिले होते. यासाठी त्याने आयोजकांकडून ५१ हजार रुपये आणि लॉजिस्टिक व्यवस्थाही घेतली होती. पोलिसांनी माधवला आधीच हरिद्वारमधून अटक करून गोव्यात आणले आहे. दरम्यान गुरुवारी माधवला वास्को न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ती रविवारी संपल्याने त्याला सोमवारी पुन्हा वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.