चैत्रोत्सवातील वीरभद्र

देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गोमंतभूमीत लहान-मोठी अनेक मंदिरे पहावयास मिळतात. या श्रद्धास्थानातूनच वर्षभर पालखी मिरवणूक, शिबिकोत्सव, रथोत्सव असे विविध उत्सव साजरे होत असतात. या उत्सवाबरोबरच कळसोत्सव, तरंगोत्सवाच्या निमित्ताने देवाचे अवसर येण्याची प्रथा दिसून येते.

Story: जत्रा |
26th April, 07:54 pm
चैत्रोत्सवातील वीरभद्र

फोंडा, सांगे, डिचोली, साखळी येथे वीरभद्राचा अवसर येतो. वीरभद्राच्या उत्पत्तीबद्दल असे सांगितले जाते की, दक्ष प्रजापतीने यज्ञसमारंभाचे आयोजन केले. त्यांनी सर्व देवदेवतांना निमंत्रणे पाठवली. पण कन्या सती-पार्वती व शिव-शंकर यांना निमंत्रण नव्हते. अंगावर वल्कले, गळ्यात सर्पमाळा, जटाधारी अशा जावयाला निमंत्रण देऊन आपले हसे करून घेण्यापेक्षा न बोलावलेले बरे असा विचार करून दक्षाने त्यांना निमंत्रण देण्याचे टाळले आहे हे माहिती असूनही नारदमूनी मुद्दामच सतीला यज्ञसमारंभाची माहिती देतात. माहेरी यज्ञ समारंभाचे आयोजन केलेले आहे हे समजताच सती माहेरी जाण्यासाठी शिवाकडे परवानगी मागते. पण तिथे आपला अपमान अटळ आहे हे जाणून शिव सतीला जाण्यास मनाई करतो. शिवाचे सांगणे झिडकारून ती माहेरी जाण्यास निघते त्यावेळी शिव तिला नंदीला सोबत घेऊन जाण्यास सांगतो व काही विपरित घडल्यास लगेच आपल्याला कळव असे नंदीला सांगतो. यज्ञमंडपात ऋषीमुनी, देवदेवता यांच्यासोबत विराजमान झालेल्या सतीला पाहून प्रजापती दक्षाचा पारा चढतो. तो सतीची अवहेलना करतो. झालेला अपमान सहन न होऊन ती यज्ञकुंडात उडी घेते व आत्मदहन करते. ही बातमी ऐकून शिवाच्या अंगाची लाहीलाही होते. रुद्रावतार धारण करुन तो थयथय नाचू लागतो. जमिनीवर आपटलेल्या जटेतूनच वीरभद्राची उत्पत्ती होते. तो त्याच्या पाठीवर थाप मारुन प्रभावळीची निर्मिती करतो. त्याच्या दोन्ही हातात तलवारी देतो. प्रभावळ जमिनीस टेकल्यास दुप्पट बळ प्राप्त होईल असा आशीर्वाद देतो. यज्ञमंडप उद्ध्वस्त करुन दक्षाचा नाश करण्यासाठी वीरभद्राला यज्ञमंडपाकडे पाठवतो. हाच तो वीरभद्र. 

गोमंतकातील काही मंदिरातून वीरभद्राचा उत्सव मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरा करतात. जत्रोत्सवाच्यावेळी निरनिराळे अवसर येतात. पण वीरभद्राचा अवसर असा आहे की, त्याला आक्रमक रुपात सजवावे लागते. उंची भरजरी पोषाख, गळ्यात माळा, हातात, कानात आभुषणे, डोक्यावर मुकूट, पायात घुंगरु, हातात तलवारी, पेटत्या मशाली, पाठीवर प्रभावळ असा वेष धारण करुन टाळ, पखवाज तालावर वाजू लागताच वीरभद्राच्या अंगात अवसर येतो. पावली मारत 'ता थैया तक थैया या' च्या तालावर तो नाचू लागतो. सौम्य रुपात असलेला वीरभद्र क्षणार्धात रुद्रावतार धारण करतो. यावेळी त्याला सांभाळणे कठीण असते. कारण तो जमिनीला टेकला तर त्याच्या अंगात दुप्पट शक्ती येते. या अवसरामुळे तो कुणालाही जुमानत नाही. तो कुणाला कापून काढील याचा भरवसा नसल्याने त्याला सांभाळण्यासाठी त्या ठिकाणची माणसे सज्ज असतात. अवसराने आक्रमक रुप धारण करताच त्याला उचलून धरतात. देवाचे तीर्थ प्राशन करताच त्याची आक्रमकता कमी होते.

डिचोली तालुक्यातील वाळवंटी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या साखळी गावात विठ्ठलापूर येथे चैत्रोत्सवातील शेवटच्या दिवशी वीरभद्र सादर केला जातो. वीरभद्र वठवणाऱ्या पात्राला तीन दिवस व्रतस्थ रहावे लागते. श्रींची पालखी मुख्य मंदिराजवळ येताच सजवलेला वीरभद्र श्री विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ येतो. देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही हातात धारदार तलवारी देण्यात येतात. या तलवारी राणे घराण्यातील असल्याचे सांगण्यात येते. पेटत्या गवताच्या गंजीभोवती टाळ पखवादाच्या तालावर पावली मारत नृत्य सादर केले जाते. पाच सहा फेरे मारल्यानंतर मध्यभागी पोहोचताच वीरभद्र आक्रमक बनतो. त्याचा थयथयाट सुरु होण्यापूर्वीच वीरभद्राला सांभाळण्यासाठी तेथे असलेल्या खास व्यक्ती त्याला वर उचलू धरतात. त्याच्या हातातील तलवारी सोडवून घेतात. तीर्थ दिल्यानंतर अवसराचे विसर्जन होते. दहा ते वीस मिनिटांतच त्याचे विसर्जन झाले पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष देऊन वाद्ये वाजवली जातात. या सोहळ्यानंतर श्रींच्या रथोत्सव मिरवणुकीने चैत्रोत्सवाची सांगता होते.


हेही वाचा